मुंबई | Mumbai
येथील पश्चिम रेल्वे लाइनवरील (Western Railway Line) राम मंदिर स्थानकात बुधवारी मध्यरात्री धावत्या लोकलमध्ये प्रसुती वेदना सुरू झालेल्या महिलेची एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत सुखरुप प्रसुती केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, या तरुणाचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विकास बेद्रे असे या तरुणाचे नाव असून, त्यांनी डॉक्टर मैत्रिण देविका देशमुखच्या (Dr. Devika Deshmukh) मदतीने हे कौतुकास्पद काम केले. महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्याने राम मंदिर रेल्वे स्टेशनवर कोणत्याही मेडिकल सुविधा नव्हत्या. त्यावेळी विकास बेद्रे हा मराठमोळा तरुण देवासारखा धावून आला. त्याने तात्काळ आपली डॉक्टर मैत्रिण देविका देशमुखला व्हिडिओ कॉल केला. यानंतर देविकाने विकास बेद्रेला व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली.
दरम्यान, त्यानंतर विकास बेद्रेनेही (Vikas Bedre) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक सूचनेचे पालन केलं आणि रेल्वे स्थानकावर तिची सुखरूप प्रसूती केली. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गोंडस बाळाचा जन्म झाला. यावेळी विकासने सदर महिलेला मुलगा झाल्याचे जाहीर केले. प्रसूतीनंतर बाळ आणि आई सुखरुप असल्याने रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर रेल्वे पोलिसांच्या (Police) मदतीने बाळ आणि आईला रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.





