नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देशातील करोडो रुग्णांना (Patients) दरमहा लागणाऱ्या रक्तदाब (बीपी), मधुमेह व हृदयविकार आणि जंतूसंसर्गावरील (अँटीबायोटिक) ३९ महत्त्वाच्या औषध-मिश्रणांचे किरकोळ दर केंद्र सरकारने (Central Government) आपल्या नियंत्रणात आणले आहेत. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने अधिकृत गॅझेट जारी करत या किमती गोठवल्या आहेत.
आतापर्यंत नामांकित फार्मा कंपन्या आपल्या मोठ्या ब्रँडच्या नावाखाली जीवनरक्षक औषधे अव्वाच्या सव्वा दराने विकत होत्या. आता औषधांच्या (Medicines) म्हणजेच रासायनिक घटक व त्याचे अचूक प्रमाणनुसार प्रति गोळी/प्रति मिली दराची कमाल मर्यादा ठरवून दिली आहे. यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारता येणार नाहीत.
औषध निर्माण कंपन्यांना केवळ सरकारने ठरवलेल्या किमतीवरच प्रत्यक्ष भरलेला जीएसटी आकारता येईल. कोणत्याही कंपनीने किंवा मेडिकल स्टोअरने या ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैशांची वसुली केली, तर त्यांच्याकडून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम व्याजासह जप्त केली जाईल आणि जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच प्रत्येक दुकानदाराला ही सुधारित दरपत्रक ग्राहकांना (Customer) सहज दिसेल, अशा ठिकाणी लावणे बंधनकारक असणार आहे.
प्रमुख औषधे व त्यांचे निश्चित केलेले कमाल दर (प्रति गोळी / कॅप्सूल)
▶ उच्च रक्तदाब नियंत्रण: अॅमलोडिपिन टेलमिसार्टन मेटोप्रोलॉल या त्रिसूत्री गोळीची किंमत आता प्रति टॅब्लेट १२.०३ रुपये असेल.
▶ हृदयविकार व कोलेस्टेरॉल हृदयविकाराच्या रुग्णांसाठी लागणारी अॅस्पिरिन + अॅटोर्वास्टॅटिन क्लोपिडोग्रेल कॅप्सूल अवघ्या ३.६७ ते ८.८६ रुपयात उपलब्ध होईल.
▶ मधुमेहावरील औषधांना चाप साखरेच्या नियंत्रणासाठी सर्वाधिक चालणारे एम्पॅग्लिफ्लोझिन सिटाग्लिप्टिन+मेटफॉर्मिन यांच्या मिश्रणांना आता १४.८८ ते १७.१७ रुपयांची कमाल मर्यादा घालण्यात आली आहे.
▶ अँटीबायोटिक्स स्वस्त जंतूसंसर्गासाठी सर्वाधिक वापरले जाणारे अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लॅव्ह्युलानेट आता प्रति गोळी १९.५३ ते २७.३१ रुपयांच्या मयदित मिळेल.
▶ इतर गंभीर आजार किचकट उपचारांसाठी लागणारे तेनेक्टेप्लेस इंजेक्शन आणि इतर विशेष द्रावणांचे दरही प्राधिकरणाने मर्यादित केले आहेत.




