मुंबई | Mumbai
महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) हे आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. या विधानांवरून कधीकधी ते वादात देखील सापडतात. असेच एक वादग्रस्त विधान मंत्री भरत गोगावले यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल केले आहे. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश राणे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता या विधानावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलतांना गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल हे खळबळजनक विधान केले आहे. मंत्री गोगावले म्हणाले की, “नारायण राणे साहेब एवढ्या सहजासहजी उंचीवर गेलेले नाहीत. त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये (Jail) गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं केलं. त्यामुळे वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र, आता भानगडी करा असं सांगत नाही, पण आपल्याला आता जुळवून चालायचे आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री गोगावले पुढे म्हणाले की, “काही वेळा मागेपुढे होईल वाईटपणा घ्यायला लागला तरी चालेल आम्ही ज्याला तिकीट देऊ त्याला निवडून आणायचा प्रयत्न करा. तुम्ही जर का कोणी कुणाला पाडायचा प्रयत्न केला तर तुमचा ‘जय महाराष्ट्र’ झाला म्हणून समजा. आम्ही राजकारणातील जुनी मंडळी आहोत आम्ही वडापाव खाऊन देखील काम केले आहे. मात्र आता राजकारण (Political) बदलले आहे कोणाला बिर्याणी लागते पण त्याबद्दल काही नाही सोबत तर वाढली आहे. आम्ही काही कमजोर आहोत, अशातला भाग नाही. पण जो प्रामाणिक काम करेल त्याचाच विचार होईल”, असा सज्जड इशारा देखील त्यांनी दिला.
तसेच “सिंधुदुर्ग जिल्ह्याचे (Sindhudurg District) वातावरण गेले अनेक वर्ष बघत आहोत. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केल्या नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र, निलेश राणे (Nilesh Rane) जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचे आहे”, असेही मंत्री भरत गोगावलेंनी स्पष्ट केले.




