मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
अदानी, अंबानीला नजरेसमोर ठेवून धोरणे आखू नका. राज्य सरकारची धोरणे ही सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवूनच आखली गेली पाहिजेत. राज्यातील शेतकऱ्यांची (Farmer) आजची अतिशय स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारने (Government) अहंकार, मुजोरीपणा बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा उपमर्द करण्याचे टाळावे, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज विधानसभेत केला. मे महिन्यात झालेल्या पावसाने शेतकरी अडचणीत आला असून त्याला प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
विरोधी पक्षाच्या वतीने आज विधानसभेत (Vidhansabha) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तवावरील चर्चेला सुरुवात करताना भास्कर जाधव यांनी शेती आणि शेतकरी प्रश्नी असलेल्या सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या विधानांचाही त्यांनी समाचार घेतला. मत्सोद्योगाला शेतीचा दर्जा दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करताना भास्कर जाधव यांनी या निर्णयात स्पष्टता आणण्याची मागणी केली.
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच योग्यवेळी कर्जमाफीचा (Loan Wavier) निर्णय घेऊ, असे आता सांगितले जात आहे. त्यामुळे तुमची ती योग्यवेळी कधी येणार? हा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. आज शेतकऱ्याला नांगरणीसाठी स्वतःला खांद्यावर नांगर घ्यावा लागत आहे. त्याच्या पत्नीला नांगर ओढावा लागत आहे. शेतकऱ्याने स्वतःला जुंपून घेऊन नांगर ओढावा हेच सरकारचे व्हिजन आहे काय? असा सवाल जाधव यांनी केला. शेतकऱ्यांप्रति सरकारमध्ये प्रेम, कणव काहीच नाही. त्यामुळे जाहिरातीबाजी करून निवडणुका जिंकता येतात पण त्याने राज्याची प्रगती होत नाही, असेही त्यांनी सरकाराला सुनावले.
मायबाप सरकारमधील (Government) मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करतात, टिंगलटवाळी करतात. मंत्री शेतकऱ्यांना म्हणतात की कर्जाच्या पैशांतून तुम्ही मुलीचा साखरपुडा करता. शेतकऱ्यांनी आपल्या मुलांच्या लग्नाचे स्वप्न पाहायचे नाही काय? मंत्र्यांच्या अशा भाषेतून त्यांचा अहंकार दिसतो. खरेतर सरकारने लगडलेल्या फळांच्या झाडाप्रमाणे नम्र असायला हवे. पण मंत्री शेतकऱ्यांचा अवमान करत असताना त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांचे कान टोचले जात नाहीत, अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली. सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.





