मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर (BJP and Central Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या दाव्याला संजय राऊत यांनी समर्थन दिले असून, ‘गोपीनाथ मुंडेंचा (Gopinath Munde) भाजपमध्ये मानसिक छळ झाला होता,’ असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे यांचा भाजपमध्ये प्रचंड अपमान आणि मानसिक छळ केला जात होता. आम्ही त्यावेळी दिल्लीत होतो, त्यामुळे हे आम्हाला ठाऊक आहे. मुंडे यांनी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती. मात्र, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे अशा प्रकारच्या पक्षांतराच्या विरोधात होते. त्यांनी मुंडेंना जिथे आहात तिथेच थांबण्याचा सल्ला दिला. जर ते काँग्रेसमध्ये आले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते” असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधींना नोटीस देणे हा सरकारचा मूर्खपणा
राहुल गांधी यांना मिळालेल्या नोटीसवरूनही राऊतांनी सरकारवर कडाडून टीका केली. “‘इडियट’ या शब्दावरही सरकार आक्षेप घेत आहे. या नावाचा चित्रपट आला असून त्याला पुरस्कारही मिळाला आहे. राहुल गांधी यांनी ‘अंधभक्त’ आणि ‘इडियट’ म्हटल्यावर त्यांना नोटीस पाठवणे हा सरकारचा आणि संसदेचा ताबा घेतलेल्या लोकांचा मूर्खपणा आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान मोदींवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान टेलीप्रॉम्पटर बंद पडल्याने पंतप्रधानांची तारांबळ उडाली होती. त्यांना भाषणासाठी मंत्र्यांकडे स्वातंत्र्यदिनाचा क्रमांक विचारावा लागला. सध्या महाराष्ट्र आणि देशात शोधून शोधून लोकांना कॅबिनेटमध्ये जागा दिली जात आहे,” असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यानुसार, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल आणि मुंडे यांच्यात गुप्त बैठकाही झाल्या होत्या. सोनिया गांधी यांनी या प्रवेशाला मंजुरी दिली होती.




