अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढले आहेत. राज्य सरकारने ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार भंडारी यांनी जिल्ह्यातील 754 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली आहे.
त्यानुसार सहायक गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, कार्यालयीन अधीक्षक, केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सहायक लेखाधिकारी आदी अधिकार्यांकडे प्रशासक म्हणून गावचा कारभार आला आहे. काही अधिकार्यांना दोन-दोन गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. या कर्मचार्यांना गावचा कारभार कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण देऊन संबंधित ग्रामपंचायतीत रुजू केले जाणार आहे. मुदत संपलेल्या 754 ग्रामपंचायतींवर गेल्या सहा महिन्यांपासून विद्यमान सरपंचांकडेच प्रशासक म्हणून जबाबदारी होती. ही मुदत संपल्यानंतर शासनाने जिल्हा परिषद अधिकार्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचे आदेश मंगळवारी काढले होते.
या प्रशासकाची नियुक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) वैध राहील. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959) मधील कलम 182 व कलम 151 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने हे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे दिले आहेत. आता प्रशासक नेमल्याने थांबलेला विकासाचा गाढा पुढे ढकलण्यास मदत होणार आहे.
अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, राहाता 25, श्रीरामपूर 27, राहुरी 44, नेवासा 59, पाथर्डी 78, शेवगाव 48, कर्जत 56, जामखेड 47, पारनेर 88, श्रीगोंदा 59: एकूण 754.




