मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने शनिवारी मुदतवाढ दिली. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने शनिवारी झालेल्या बैठकीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी (Final Voter List) १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
बीएलओ घरी जाणार
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ किंवा ‘तार्किक विसंगती’ या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलवो)आवश्यक कागदपत्रे संकलित करतील. कागदपत्रांचे संकलन घरातूनच करण्यात येणार असल्याने संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल. अशा सुनावणीस मतदाराच्या वतीने कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकणार आहे.
बेघर, मजूर आणि गरजू नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष
राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील दुरुस्तीच्या प्रक्रियेत सुलभता मिळावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना गरजेनुसार विशेष मदत कक्ष आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.




