मुंबई | Mumbai
छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा (UNESCO World Heritage Status) मिळाला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. जागतिक वारसा यादीत या गडकिल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. तसेची ठिकठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आज पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणत घोषणा दिल्या. तसेच महायुतीच्या आमदारांच्या (MLA) हातात वेगवेगळ्या प्रकारचे फलक देखील बघायला मिळाले.
दरम्यान, दुसरीकडे आज विधानभवनात (Vidhanbhavan) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण चर्चा होण्याची चिन्हे आहेत.




