मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची (Malegaon Bomb Blast Case) सुनावणी (Hearing) करणारे विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या बदलीला उच्च न्यायालयाने (High Court) तात्पुरती स्थागिती दिली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आला असतानाच लाहोटी यांच्या बदलीचा आदेश निघाला होता. त्यावर बॉम्बस्फोट पिडीतांनी आक्षेप घेल्यानंतर अखेर उच्च न्यायालयाने लाहोटी यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay Sessions Court) विशेष एनआयए न्यायालयात (NIA Court) मागील १७ वर्षांपासून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. या कालावधीत बॉम्बस्फोटाची सुनावणी करणारे न्यायाधीश वेळोवेळी बदलले. न्यायाधीश लाहोटी हे या प्रकरणातील पाचवे न्यायाधीश आहेत. त्यांनी सुनावणीला गती देऊन खटला अंतिम टप्प्यात आणली. याचदरम्यान उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने त्यांची नाशिक येथे बदली करण्याचा आदेश जारी केला.
उन्हाळी सुट्टीनंतर ९ जून रोजी न्यायालये पुन्हा सुरू झाल्यानंतर तो बदलीचा आदेश लागू होणार होता. मात्र त्याआधीच बॉम्बस्फोटपीडित कुटुंबीयांतर्फे शाहिद नदीम यांनी लाहोटी यांच्या बदलीच्या आदेशावर आक्षेप घेतला होता. न्यायाधीशांच्या बदलीमुळे न्यायदानावर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांतच गुरुवारी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी लाहोटी यांच्या बदलीचा आदेश स्थगित (Stayed) केला असून त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.