मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यास संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक शैलीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
चंद्रकांत पाटलांवर शेलक्या शब्दांत टीका
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दगडावरच्या फुटप्रिंट्स आधारशी लिंक करणार का? या विधानाचा समाचार घेताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “आम्ही लहान असताना आईवडील सांगायचे की रात्री डोक्याला तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. पण एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपड चोपड चोपडलं, तरी बुद्धी काही आली नाही! ज्याचा प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो, ते म्हणजे राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री.मला तर चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी त्यांना ज्ञानासाठी शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात पाठवलं, पण तिथेही काही फरक पडला नाही. असे शिक्षणमंत्री भेटल्यावर आजच्या ‘जेन झी’ पिढीचा पारा चढणार नाही तर काय होणार?” असे त्यांनी म्हटले.
‘जेन झी’ पिढी आणि बदलता काळ
आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत राज ठाकरे म्हणाले, “माझ्या राजकारणाची सुरुवातच विद्यार्थी सेनेतून (Student Wing) झाली. काम करत आणि घडत मी इथपर्यंत आलो आहे. आम्ही टेलिग्रामपासून ते इन्स्टाग्रामपर्यंतचा काळ पाहिला आहे. १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली ‘जेन झी’ (Gen Z) पिढी आज वेगळा विचार करते. त्यांना काय हवंय, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच फक्त इंग्रजी बोलणारे किंवा मुंबई, पुणे, दिल्लीत राहणारे तरुणच ‘जेन झी’ नाहीत, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही ही मुलं राहतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जुन्या भ्रामक कल्पना सोडून देण्याचे आवाहन
नव्या पिढीशी (New Generation) संवाद साधताना जुन्या कल्पना सोडून नव्या पद्धतीने विचार केला पाहिजे, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. “अमित ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी या सदस्य नोंदणी मोहिमेत आणि आगामी कामांमध्ये उत्तम कामगिरी करतील अशी मला आशा आहे,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘तुम्ही जे पेरलं तेच उगवलंय…’; पंतप्रधान मोदींच्या विधानावर पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘जेन झी’ (Gen Z) तरुणाईकडून त्यांच्यावर आणि त्यांच्या मातोश्रींवर झालेल्या खालच्या पातळीवरील टीकेवर नाराजी व्यक्त केली होती. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांचे म्हणणे १०० टक्के बरोबर असून कोणाबाबतही खालच्या थरातील भाषा वापरली जाऊ नये; पण हेच पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पक्षातील लोकांनाही सांगावे,” असा थेट टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
दुसऱ्यांनाही आया-बहिणी असतात!
राज ठाकरे म्हणाले, “पंतप्रधानांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर झालेल्या टीकेबाबत मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. कोणावरही खालच्या भाषेत टीका होणे अयोग्यच आहे. मात्र, हीच गोष्ट पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही समजावून सांगायला हवी. दुसऱ्यांनाही आया-बहिणी असतात, हे त्यांनी स्वतःच्या पक्षातील लोकांना आठवून दिले पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.
ट्रोलर्सच्या टोळीवर डागली तोफ
भाजपच्या (BJP) डिजिटल ट्रोलिंग संस्कृतीवर निशाणा साधत मनसे प्रमुख पुढे म्हणाले, “गेल्या १२ वर्षांत देशात ही संस्कृती सुरू झाली आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून ते अगदी आमच्यापर्यंत सर्व विरोधकांना ट्रोल करण्यासाठी भाजपची एक विशेष टीम प्रत्येक राज्यात बसवण्यात आली आहे. ते कोणत्या भाषेत बोलतात हे सर्वांना ठाऊक आहे. महाराष्ट्रात अनेक कलाकार आहेत जे म्हणतात की, भाष्य केल्यावर खूप शिव्या पडतात म्हणून ते बोलणे टाळतात. अशा ट्रोलर्सनाही पंतप्रधानांनी रोखायला हवे. गेल्या काही वर्षांत तुम्ही जे पेरले आहे, तेच आज उगवले आहे आणि तेच आता तुमच्या अंगावर येत आहे. त्यामुळे इतरांना उपदेश देण्याआधी पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षातील लोकांना आणि ट्रोलर्सना आवर घालावा” असेही राज ठाकरे म्हणाले.




