मुंबई | Mumbai
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दि.२८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये (Baramati) विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. आज (सोमवार) पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत अजित पवार यांच्या निधनंतर विधानसभेत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार उद्धव ठाकरे, जयंत पाटील, भास्कर जाधव यांच्यासह आदींनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या शोक प्रस्तावावर बोलताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे देखील भावूक झाल्याचे दिसून आले.
यावेळी ते म्हणाले की, “अजित पवार हे सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता असायचे. चुकले तर कान पकडायचे व चांगले बोललो की स्तुती करायचे. व्यक्तिगत, बेकायदेशीर विषय घेऊन आलेल्यांचा त्यांना राग यायचा. दादांवर नको ते आरोप झाले, तेव्हा ते अस्वस्थ व्हायचे. पण एकही आरोप सिद्ध करता आला नाही. दादा आता नाहीत, त्यामुळे ते आरोप व ते डाग आता पुसले पाहिजेत. आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकले गेले तर ती त्यांना आदरांजली ठरेल, असे रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटले.
पुढे ते म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताच्या (Plane Crash) घटनेत दोषी असणार्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय किंवा शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना भर सभागृहात शब्द देतांना म्हटले की, “मला काकींना सांगायचं आहे. काकी तुमच्या पुढच्या राजकीय प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं, तुमच्या पुतण्याला जिथे कुठे मदत लागेल तिथे मी तयार असेन. जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. काकांच्या विचारांवर आणि काकांच्या स्टाईलने नक्कीच काम करत राहीन,असेही रोहित पवारांनी म्हटले.
तेव्हाच वरच बटण लावणार
या विधानसभेत आल्यानंतर अजूनसुद्धा अजित दादा कुठे बसले आहेत, आमच्याकडे लक्ष ठेवून असतील, अधिवेशनात येत असताना अजूनही आपल्याल आठवत असेल, त्यांची कपडे घालण्याची स्टाईल, कधीतरी गॉगल घालणार, त्यांच्याबरोबर आमदारांचा घोळका, कार्यकर्त्यांचा घोळका, मीडिया बरोबर मी बोलत असेल तर मागून मिश्किलपणे एखादा टोमणा मारणं असेल, त्याचबरोबर अधिवेशनात बसल्याबरोबर कोण काय बोलतंय, शांतपणे या अधिवेशनात काय चाललंय हे बारकाईने अजित काका बघत असत.एकदा अजितदादा मला म्हणाले होते की, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, त्या कमी कर. ते गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. तुझं शारिरीक वजन वाढलंय. शारिरीक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो म्हणायचो. मी अजितदादांना शब्द देतो. माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन. शारिरीक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन. तसेच अजितदादा म्हणायचे वरचं बटण लावत जा. पण एक मात्र मी सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर मी ज्यावेळी अजितदादांना भेटायला जाईन, तोपर्यंत मी माझं बटण असंच उघडं ठेवणार. कारण हे वरचं बटण तुमची मला रोज आठवण देत राहील असंही रोहित पवार म्हणाले.
आजचा प्रसंग माझ्यासाठी आणि सर्वांनाच प्रचंड भावनिक
अध्यक्ष महोदय, माझे अजित काका, महाराष्ट्राचे अजित दादा, विकासाचे अजित दादा, आजचा हा प्रसंग माझ्यासाठी आणि सर्वांनाच प्रचंड भावनिक आहे. शरद पवार यांच्या बरोबर ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारणात प्रेरणा घेतली तो आमचा अभिमान, स्वाभिमान, आमचे आधार, माझे काका आणि महाराष्ट्राचे अजित दादा, ज्यांच्या शोक प्रस्तावावर बोलण्यास आज मी या ठिकाणी उभा आहे, असं रोहित पवारांनी सुरुवातीला सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हा शोक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मी पाठिंबा देतो. ६६ वर्षे ६ महिने आणि ६ दिवस असा अजित दादांचा प्रवास, पायाखालची जमीन सरकणे काय असते ते २८ जानेवारीला आम्ही सर्वांनी अनुभवलं. अजित दादांचं कार्य, हे ४० वर्षांपेक्षा जास्त आहे. माझं वय ४० आहे, माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव अजित काकांचा राजकारणात होता. या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं काही मिनिटांत बोलणं तसं सोपं नाही. कितीही पानं वाचली तरी त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, त्यांनी केलेली कामे जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, असंही त्यांनी म्हटले.





