मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (NCP National President) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे समजते.
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीची (NCP) महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे मंत्री, आमदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव सुचवले. सर्व आमदारांनी हात उंचावून त्यांच्या नावाला अनुमोदन दिले असल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत सुनेत्रा पवार यांना आग्रह झाल्यानंतर अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष (Party) विखरू नये म्हणून आपण जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते.
विलीनिकरणावर माध्यमांत चर्चा नको
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत विलीनिकरणाच्या संदर्भात तूर्तास चर्चा नाही. विलीनिकरणाच्या संदर्भात बाहेर माध्यमांमध्ये बोलू नये अशा सूचना बैठकीत आमदारांना दिल्या आहेत. पक्ष संघटना वाढ, राष्ट्रीय अध्यक्ष निवड आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भातील चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पटेलांचे नाव होते आघाडीवर
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव आघाडीवर होते. त्यातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत पटेल यांचे नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून घेतले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू होती. पटेल यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत वादावर पडदा टाकला होता. परंतु आता स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली.





