मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपला असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महायुतीच्या नवीन सरकारच्या सत्तास्थापनेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. परंतु, भाजप आपल्याकडे मुख्यमंत्रीपद ठेवण्यावर ठाम असून त्यांनी एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शिंदेंनी या दोन्ही ऑफर धुडकावल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने एकनाथ शिंदे यांना राज्याचे उमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र या ऑफरवर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास एकनाथ शिंदे फक्त पक्षप्रमुख म्हणून काम पाहणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शिवसेनेकडून राज्यात उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन नावे महायुतीला देणार असल्याचे समजते. त्यामध्ये मागासवर्गीय किंवा मराठा चेहरा असू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. यात भाजपने सर्वाधिक जागा असल्यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला असून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.