मुंबई | Mumbai
शेतकऱ्यांविषयी (Farmer) सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणे आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कोकाटे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) कोकाटे यांनी मंत्रालयात पक्षाचे मुख्यनेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawr) कडक शब्दांत समज दिली. यावेळी त्यांच्या राजीनाम्याबाबत देखील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या (NCP Minister) बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांना समज द्यावी, असे म्हटले. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोकाटे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी देखील दाखल झाले आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी कोकाटे देखील हजर होते. त्यावेळी अजित पवारांनी कोकाटे यांना ‘तुमच्यामुळे सरकारची (Goverment) बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यावर कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत यापुढे बोलतांना, वागताना काळजी घेईल, असे स्पष्टीकरण दिले.
राजीनामा नाही, खातेबदल होणार?
अजित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय आता माझ्याकडे नसून तो,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही अजित पवारांनी सांगितले. तर दुसरीकडे कोकाटे यांचा राजीनामा न होता त्यांचे खाते बदलले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.





