मुंबई | Mumbai
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांवरील (Santosh Deshmukh) अत्याचाराचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचा आरोपी म्हणून समावेश झाल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. यानंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पीए मार्फत राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला आहे. त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) म्हणाले की, “राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सोपविला असून त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे (Governor) पाठविला आहे”, असे त्यांनी म्हटले.
अडीच महिन्यानंतर राजीनामा
०९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आज सकाळपासूनच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता. तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.