मुंबई | Mumbai
काल (शुक्रवारी) बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा (OBC Melava) पार पडला.या मेळाव्यात मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujal) आमदार धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके यांच्यासह आदी नेत्यांनी मनोज जरांगेंवर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलतांना भुजबळ यांनी काँग्रेस आमदार आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आज (शनिवारी) वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत भुजबळांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
यावेळी ते म्हणाले की, “नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या ओबीसींच्या सभेचा धसका भाजपने घेतला आहे. या सभेची गर्दी बघून भाजप (BJP) घाबरला असून,त्यांनी भुजबळांना माझ्यावर टीका करण्यासाठी सोडले आहे.कालच्या एल्गार मेळाव्यात फक्त सत्ताधारीच पक्ष होता. सत्ताधारी पक्षाने मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे, पण सरकारमध्ये बसून काहीच करायचं नाही? असा सवाल करताना जरांगे पुराण बस्स झालं,सरकार पुराण करा. भाजपने आपल्या फेक नरेटिव्हच्या फॅक्ट्रीतील भुजबळ यांना माझ्यावर सोडलं असून, मला टार्गेट केलं जात आहे”, असे त्यांनी सांगितले.
पुढे वडेट्टीवार म्हणाले की, “छगन भुजबळ यांना मी कधीच त्रास दिला नाही. त्यांच्या भूमिकेवरून मी कधी प्रश्न काढला नाही. भुजबळ मंत्रिमंडळात असताना दोनदा जीआर निघाले. या जीआरमध्ये आधी पात्र शब्द होता. त्यानंतर तो शब्द काढून नवा जीआर काढला. त्यामुळे हा जीआर रद्द करण्यासाठी लढाई असली पाहिजे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे मला टार्गेट करतात. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, यापेक्षा दुसरा आनंद नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच “महायुती सरकार (Mahayuti Government) समाजासमाजात भांडण लावत आहे. जातीजातीत आग लावत आहे.राज्य अस्थिर करण्याचे काम सुरू आहे. राज्य अस्थिर ठेवून मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे. जर टार्गेट फडणवीस असतील तर हा जीआर काढताना त्यांच्या टार्गेटला हे बळी पडले का? त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला. त्याला मुख्यमंत्री बळी पडले का? सरकार झुकले का? सरकारने जीआर काढला त्याविरोधात बोलत नाही. नुसतं जरांगे सुरू आहे. जरांगेंनी तर आमचं वाटोळ केलचं. पण सरकारच्या जीआरचं काय? सरकारविरोधात कधी बोलणार?” असा सवालही वडेट्टीवारांनी केला.




