मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी आज ॲड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची एकमुखाने फेरनिवड झाली. या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी तिन्ही नेत्यांनी विरोधीपक्षांच्या नेत्यांना चिमटे काढले. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकसंघ राष्ट्रवादी असताना आपले जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांचाच ‘टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम’ हा डायलॉग मारून टोला लगावला.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “तुम्ही पुन्हा येईल म्हणाले नाहीत, तरी आलात…”; देवेंद्र फडणवीसांकडून भाषणावेळी चिमटे
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की,”निवडणुकीच्या (Election) काळात अनेक जण संविधान हातात घ्यायचे. संविधान हातात घेतले म्हणजे आदर वाटतो आणि जे घेत नाहीत त्यांना संविधानाबद्दल आदर नसतो असे आहे का? संविधानाच्या तरतुदीनुसार संबंधित सदस्यांनी आसन ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे आवश्यक आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे तरतुदींचा भंग आहे. मला विरोधकांच्या (Opponents) बहिष्कारबाबत विचारण्यात आले, त्यावेळी ‘आजचा दिवस बहिष्कार आहे, उद्या जर यांनी शपथ घेतली नाही तर त्यांना सभागृहात बसता येणार नाही. उद्या गपगुमान शपथ घेतील, काही काळजी करू नका. जरा कळ काढा, असे मी माध्यमांसमोर बोलताना म्हटले होते. कळ काढली आणि विरोधकांनी शपथा घेतल्या”, असा चिमटाही त्यांनी यावेळी विरोधी आमदारांना घेतला.
हे देखील वाचा : Nashik Winter : नाशिककरांना हुडहुडी! निफाडचे ६.७, तर नाशिकचे तापमान ९.४ अंशांवर
ते पुढे म्हणाले की, “निवडणूक घेण्याचा अधिकार संविधानाने (Constitution) निवडणूक आयोगाला दिलेला आहे, तो सामान्य जनतेला नाही. मारकडवाडीबद्दल आम्हालाही आपलेपणा, प्रेम, जिव्हाळा आहे. पण, कारण नसताना बाऊ केला जात आहे. कधी तरी लक्षात घ्या की आपला ‘करेक्ट कार्यक्रम झालेला आहे’. आपल्याला जनतेने नाकारले आहे. आमची बाजू खरी आहे हे नागपूरच्या अधिवेशनात दाखवून देईल. लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या तेव्हा आम्ही रडलो नाही. ३१ जागा आल्या तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं, आता गार वाटतंय की गरम ते तुमचं तुम्हीच बघा”, असा टोलाही यावेळी अजित पवार यांनी ईव्हीएमवरून (EVM) विरोधकांना लगावला.