नाशिक | Nashik
राज्यातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्याने बदल होत असून कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण आहे. यामध्ये राज्यातील काही भागांत थंडीचा (Cold) जोर चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पहाटे आणि रात्री शेकोट्या पेटत असून पुढील काही दिवसांत आणखी थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच वातावरणात गारवा परतत असताना पाऱ्यात घसरण होत आहे.
त्यातच नाशिककरांना (Nashik) आज चांगलीच हुडहुडी भरली असून आजचे नाशिकचे तापमान ९.४ तर निफाडचे ६.७ अंश इतके आहे. काल रविवार (दि.०८) रोजी नाशिकचे किमान तापमान १२.५ अंश, तर कमाल तापमान २९.५ अंश सेल्सियसवर कायम राहिले. तर निफाडचे किमान तापमान ११.७ अंश तर कमाल तापमान २८.४ अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. तर पाऱ्यातील घसरण सुरुच राहणार असल्याचा अंदाज असल्याने गारठ्याची तीव्रता आणखी वाढणार आहे.
दुसरीकडे मागील आठवड्यात ढगाळ हवामान आणि पाऊसाने निफाडच्या द्राक्षपंढरीला हैराण केले होते. मात्र, आज सोमवार (दि ०९) रोजी निफाडचा (Niphad) पारा ६.७ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर करण्यात आली आहे. पारा घसरत असल्याने पाणी उतरत असलेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिवाय द्राक्षवेलीच्या विकास खुंटणार असल्याने पुरेसे पाणी देणे अथवा शेकोटी पेटविणे यासारखे उपाय द्राक्ष बागायतदारांना करावे लागणार आहेत. तर गहू, हरभरा आणि कांदा या रब्बी हंगामातील पिकांसाठी मात्र थंड हवामान पोषक असल्याचे तज्ञ व अनुभवी शेतकऱ्यांचे मत आहे.
दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी राज्यात दि.०९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज वर्तवविला आहे. तर १४ तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान कलाटणी घेणार असा अंदाज देखील आहे. तर राज्यात १५ डिसेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान बिघडण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरनंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी (Rain) पोषक परिस्थिती तयार होणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तविला आहे.