Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : मुंबई वार्तापत्र - शिंदे, अजितदादांसमोर स्वबळाचे आव्हान

Maharashtra Politics : मुंबई वार्तापत्र – शिंदे, अजितदादांसमोर स्वबळाचे आव्हान

मुंबई | उद्धव ढगे-पाटील | Mumbai

भाजपच्या (BJP) वाढत्या राजकीय महत्वाकांक्षांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. भाजपला मुंबईत (Mumbai) शिंदे सोबत हवेत. पण त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मात्र भाजपला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात दिवाळी (Diwali) पार पडल्यानंतर राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका ३१ जानेवारीच्या आत घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यात राज्यातील २९ महापालिका, २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायती, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. तयारीत भाजपने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली आहे.

YouTube video player

भाजपमध्ये निवडणुकीची सारी सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहेत. जेथे पक्ष मजबूत आहे तेथे भाजप स्वबळावर लढेल, असे जाहीर करून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपच्या निर्णयामागे फरफट जाण्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही. त्यामुळे शिंदे आणि अजितदादांना आपापल्या बालेकिल्ल्यात अनुक्रमे ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपशी दोन हात करावे लागतील. परिणामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक भाजपशी युती करून लढविलेल्या शिंदे आणि अजितदादांसमोर स्थानिक निवडणुकीत स्वबळाचे आव्हान असणार आहे.

स्वराज्य संस्थांच्या यापूर्वी स्थानिक निवडणुका विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिकसह १० महापालिकांच्या निवडणुका २०१७ मध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी फडणवीस हेच मुख्यमंत्री पदावर होते. तेव्हा भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या सोबत होते. शिवसेना केंद्र आणि राज्यातील सत्तेत सहभागी होती. तरीही फडणवीस यांनी त्या निवडणुकीत शिवसेनेला दयामाया दाखवली नव्हती. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या तोंडाला तेव्हा फेस आणला होता. आताही भाजप आक्रमकपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. यावेळी भाजपच्या रडारवर उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. स्थानिक निवडणुकीत या दोघांना राजकीय अस्मान दाखवण्याची भाजपची इच्छा आहे. तरीही निवडणुकीनंतर गरज लागेल तेव्हा स्थानिक समीकरणानुसार या दोघांना भाजप पुन्हा सोबत घेऊ शकते.

लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे निदान शक्य झाल्यास महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढाव्यात, असा शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मतप्रवाह आहे. मात्र, फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या महापालिकेत पक्षाची ताकद वाढलेली आहे, तेथे भाजप युती करण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, जेथे भाजप राजकीयदृष्ट्या कमजोर आहे, अशा चार ते पाच महापालिकांत भाजप मित्र पक्षांना सोबत घ्यायला तयार आहे. अर्थात त्यासाठी भाजप देईल तेवढ्या जागांवर शिंदे आणि अजित पवार गटाला समाधान मानावे लागेल. अर्थात शिंदे आणि पवार हे मान्य करतील की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

शिंदेंचे मोदींना साकडे

भाजपच्या वाढत्या राजकीय महत्वाकांक्षांमुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. भाजपला मुंबईत शिंदे सोबत हवेत. पण त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मात्र भाजपला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे. ठाण्याप्रमाणे नवी मुंबई महापालिकेतही भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. जेथे भाजप कमजोर आहे, अशा वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, पनवेल या महापालिकांमध्ये भाजपला मित्र पक्षांची साथ हवी आहे. बाकी नागपूर, नाशिकसारख्या महत्वाच्या महापालिका निवडणुकीसाठी मित्र पक्ष भाजपच्या खिजगणतीत सुद्धा नाहीत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांविरोधात तक्रार केल्याचे समजते. मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग आहेत. भाजपने सर्वच जागांवर तयारी करून ठेवली आहे.

तरीही महायुती झाली तर २२७ पैकी १५० जागांवर भाजपचा दावा असणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला फारतर ५० ते ५५ जागा मिळू शकतात. इतक्या कमी जागा घेण्यास शिंदे तयार नाहीत. कारण मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याच्या आश्वासनावर उद्धव ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले. जर उमेदवारी मिळणार नसेल तर हे माजी नगरसेवक आणि स्थानिक प्रभावी नेते पुन्हा ठाकरे गटात जाऊ शकतात. अशातच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेने शिंदे गटातील ‘इनकमिंग’ काहीसे थांबले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपल्या अडचणी मोदींच्या कानावर घातल्या. यावर मोदी काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे दिल्लीतून लक्ष ठेवणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली असणार.

मनोमिलनाचा परिणाम

विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाविकास आघाडी जवळपास अस्तित्वहीन झाली आहे. आता महाविकास आघाडीऐवजी विरोधी पक्ष म्हणून आघाडीतील घटक पक्ष एकत्र येताना दिसतात. अशातच गेल्या काही दिवसात उद्धव आणि राज या ठाकरे बंधूमध्ये जवळीक वाढू लागल्याने त्याचा परिणाम आघाडीवर होताना दिसत आहे. ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. मुंबईत भाजपशी सामना करायचा असेल आणि महायुतीला रोखायचे असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव ठाकरे बंधूंना झाली आहे. त्यामुळे राजकीय अपरिहार्यता आणि एकमेकांची गरज ओळखून ठाकरे बंधूची वाटचाल एकत्र येण्याच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज ठाकरे यांची उत्तर भारतीय नागरिकांच्या विरोधातील भूमिका सर्वश्रुत आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना राज ठाकरे यांच्यापासून नेहमीच दूर रहावे लागते. त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. मुंबईत मुस्लीम आणि काही प्रमाणात हिंदी भाषिक मतदार काँग्रेससोबत आहे. हा मतदार पक्षापासून दुरावू नये म्हणून मुंबई काँग्रेसचे नेते स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. अर्थात या मागणीला मुंबई काँग्रेसमधील नेत्यांचे अंतर्गत मतभेद सुद्धा कारणीभूत आहेत. मुंबई काँग्रेसमधील एक मोठा गट खासदार वर्षा गायकवाड यांचे नेतृत्व मानायला तयार नाही. अशातच उद्धव ठाकरेंसोबत निवडणुका लढवल्या तर काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा येतील. त्यातून पक्षांतर्गत धुसफूस वाढेल, अशी काँग्रेस नेत्यांना भीती आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी. यानिमित्ताने पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह घराघरापर्यंत पोहचेल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा संताप

केंद्र आणि राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपच्या मांडवात सध्या अन्य पक्षातील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक माजी आमदारांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात दर मंगळवारी पक्षप्रवेश सोहळे पार पडतात. मात्र, आता भाजपच्या मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाहेरचे नेते नकोसे झाले आहेत. त्याचे प्रत्यंतग सध्या सोलापूरमध्ये येत आहे. अजित पवार यांच्या गटाचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र, या नेत्यांच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. भाजपच्या सोलापूर कार्यालयासमोर धरणे धरून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पक्ष विस्ताराच्या नावाखाली अन्य पक्षातील आणखी कुणाकुणाला पावन करून घ्यायचे याचा विचार राज्यातील भाजप नेत्यांना करावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित दादांसारख्या लोकनेत्याला कायमचा मुकलो; शोकसभेत सर्वपक्षीय...

0
नाशिक | Nashik स्व.अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लोकनेत्याला कायमचे मुकले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यात कुठलीही...