मुंबई | Mumbai
राज्यात भीषण दुष्काळाच्या (Drought) संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिवाळीनिमित्त बँक खात्यात ५००० रुपयांची मदत जमा केली आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे जलसंपदा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी, “ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज नसेल, अशा सक्षम शेतकऱ्यांनी हे ५००० रुपये परत करावेत,” असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
मंत्री महाजन यांच्या विधानाचा समाचार घेताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, “गिरीश महाजन यांना मला सांगायचं आहे, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. एकतर ५ हजार रुपये देऊन तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा केली आहे आणि त्यातही आता गरिबांच्या बाबतीत दिलेले पैसे परत मागत आहात. शेतमजुरांना तुम्ही काहीच मदत केली नाही. पवित्र भूमी नाशिकमध्ये, जिथे महाकुंभ होतोय, तिथे तुम्ही हजारो कोटींचा भ्रष्टाचार करत आहात. या सरकारमधील प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे, यांना काहीच कळत नाही. अशा नेत्यांना योग्य वेळी जनताच जागा दाखवेल”, असे त्यांनी म्हटले.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले होते?
मंत्री गिरीश महाजन यांनी “सरकारने (Government) सर्व शेतकऱ्यांना (Farmer) पाच-पाच हजार रुपयांची मदत दिली आहे. मात्र, अनेक शेतकरी असे आहेत जे मला भेटले आणि त्यांनी सांगितले की, आम्हाला ५ हजार रुपये मिळाले आहेत, पण आम्हाला ते परत करायचे आहेत; कारण आम्हाला त्याची आवश्यकता नाही. आमचा जोडधंदा आहे आणि आमच्याकडे तशी पैशाची चणचण नाही. त्यामुळे ज्यांना गरज नाही, अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांनी हे ५००० रुपये परत करावेत”, असे आवाहन केले होते.




