Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra Politics : मेळाव्यांचा सुकाळ, विचारांचा दुष्काळ!

Maharashtra Politics : मेळाव्यांचा सुकाळ, विचारांचा दुष्काळ!

मुंबई | उद्धव ढगे-पाटील | Mumbai

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) भाषणात हिंदुत्वाच्या, देशप्रेमाच्या मुद्यावर संघ आणि भाजपला फटकारले. हिंदुत्वाच्या मुद्यावर या दोघांशी दोन हात करण्याची आपली तयारी असल्याचा संदेश ठाकरेंनी आपल्या भाषणातून दिला.

- Advertisement -

विजयादशमीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानात (Shivaji Park Ground) होणारा शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा, नागपूरच्या (Nagpur) रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नागपूरमध्ये आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन मेळावा हे महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संचित आहे. देशाच्या अन्य राज्यात क्वचितच अशा प्रकारचे दसरा मेळावे भरत असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील मेळाव्यांचे महत्व अधिक आहे. या मेळाव्यातून मांडल्या जाणाऱ्या विचारांकडे, नेत्यांच्या भाषणाकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष असते. मात्र, अलीकडच्या काळात दसरा मेळाव्याची संख्या वाढली पण विचारांची उंची वाढू शकली नाही.

YouTube video player

पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विशिष्ट जातीचे दसरा मेळावे भरू लागले आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार असलेल्या पंकजा आणि धनंजय या मुंडे बहीण-भावंडांचा दसरा मेळावा पूर्वी पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर होत होता, तो आता पाटोदा तालुक्यातील भक्ती भगवानगडावर झाला. मराठा आरक्षण आंदोलनाने चर्चेत आलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी येथेही बंजारा समाजाचा दसरा मेळावा यंदा पार पडला. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेचे एकाचवेळी दोन दसरा मेळावे होत आहेत. अलीकडच्या काळात दसरा मेळाव्यातून समाजाला दिशा देण्याचे काम अभावानेच होताना दिसत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याला तर चिखलफेकीचे, वैयक्तिक हेवेदाव्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचे फलित काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे यंदाच्या संघाच्या विजयादशमी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. या सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. अमेरिकेने स्वीकारलेले टैरिफ धोरण, पहलगाम हल्ला, शेजारील बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशात निर्माण झालेली परिस्थिती, देशाच्या सद्य आर्थिक परिस्थितीत श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढती दरी, पर्यावरणाचा ऱ्हास आदी मुद्यांना डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला. २ ऑक्टोबर रोजी दसरा आणि महात्मा गांधी यांची जयंती असा योग जुळून आला. यापूर्वी २००६ मध्ये असा योगायोग आला होता. मात्र, यावेळी संघाचा शताब्दी सोहळा गांधी जयंतीदिनी आल्याने मेळाव्यात गांधीजींचा उल्लेख अपरिहार्य होता. रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्लीतील संघ रॅलीत महात्मा गांधी सहभागी झाले होते, असा दावा केला. या दाव्यातून त्यांनी गांधीजी आणि त्यांचे विचार संघासाठी कधीही अस्पृश्य नव्हतेच हेच अधोरेखित केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. ‘एक नेता, एक मैदान’ म्हणून बाळासाहेबांनी दसरा मेळाव्याला राजकीय वलय प्राप्त करून दिले. बाळासाहेबांची ही परंपरा त्यांचे राजकीय उत्तराधिकारी उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेवली. यंदाचा ठाकरे गटाचा मेळावा भर पावसात पार पडला. मराठवाड्यातील शेतकरी, पूरग्रस्त चिखलात असल्याने ठाकरेंनी पावसाचे सावट असले तरीही मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार मेळावा पार पडला. शिवसैनिकांनी पावसाची तमा न बाळगता उद्धव ठाकरेंच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाकरे यांनी या मेळाव्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या भाषणात मुंबई महापालिका निवडणुका संदर्भ येणे अपरिहार्य होता आणि तसा तो आला. यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीका करणे कटाक्षाने टाळले. २०२२ पासूनच्या प्रत्येक दसरा मेळाव्यात शिंदे हेच ठाकरेंचे लक्ष्य होते. मात्र, आता शिंदेंना अजिबात महत्व द्यायचे नाही, असे त्यांनी ठरवलेले दिसते.

मुंबई महापालिका निवडणुकीत आपला सामना भाजपशी आहे, याची पक्की जाणीव ठाकरे यांना आहे. काँग्रेसशी आघाडी केली म्हणून भाजप आणि परिवार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपल्या पक्षाला महापालिका निवडणुकीत नामोहरम करण्याचा प्रयत्न करेल, हे ठाकरे जाणून आहेत. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्वाच्या, देशप्रेमाच्या मुद्यावर संघ आणि भाजपला फटकारले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० बर्षे मेहनत घेतली. पण संघाच्या झाडाला विषारी फळे आली, याचे तुम्हाला समाधान आहे काय? असा बोचरा सवाल करत ठाकरे यांनी मशिदींना भेटी देण्याच्या मुद्यावरून डॉ. भागवत यांच्यावर टीका केली. आशिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला पाणी पाजले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्टि केलेल्या मजकुराचा संदर्भ देत क्रिकेटची तुलना युद्धाशी करणारा माणूस बेशरम असल्याचे म्हणत ठाकरे यांनी थेट मोदींना अंगावर घेतले. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप आणि संघाशी दोन हात करण्याची तयारी असल्याचा संदेश ठाकरेंनी आपल्या भाषणातून दिला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को मैदानात पार पडला. या मेळाव्यात शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आपल्याला दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीचा भगवा फडकावयाचा आहे. आगामी स्थानिक निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळाली पाहिजे, कुणाचे कुणाबरोबर मनोमिलन होते याची चिंता तुम्ही करू नका. शिवसैनिकांनी स्वतःला एकनाथ शिंदे समजून जोमाने काम करा. मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, असा कानमंत्र शिंदे यांनी आपल्या कार्यकत्यांना दिला. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला होता. या दौऱ्यावरून शिंदे यांनी ठाकरेंचा समाचार घेतला. वर्क फ्रॉम होम करणारा, फेसबुक लाईव्ह करणारा किंवा कपड्याची इस्त्री सांभाळणारा, व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा हा एकनाथ शिंदे नाही.

आपत्तीत घरात बसणारी व्यक्ती बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही. यांचे दौरे म्हणजे ‘खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम,’ अशा बोचऱ्या शब्दात शिंदेंनी ठाकरेंच्या दौऱ्याची खिल्ली उडवली. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आल्याचा दावा करून नाहक वाद ओढवून घेतला. आता या मुद्यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि रामदास कदम आमने सामने आले आहेत. बाळासाहेबांचा मृत्यू २०१२ मध्ये झाला. आता १२- १३ वर्षांनी त्यांच्या मृत्यूवरून दोन्ही गटांनी एकमेकांना भिडावे, एकमेकांची उणीदुणी काढावीत, हे स्वतः शिंदे गटाच्या सामान्य शिवसैनिकांना पटलेले नाही.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा ओबीसी असा संघर्ष पेटला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वतः पंकजा मुंडे यांना या संघर्षाची झळ पोहचली. त्यामुळे भक्ती भगवानगडावरील मेळाव्यात पंकजा यांना गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिले होते, याची आठवण करून द्यावी लागली. त्याचवेळी फक्त ओबीसींच्या ताटातील आरक्षण घेऊ नका, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. तर नारायणगडावरील मेळाव्यात मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्याला हात घातला. मराठा समाज शिक्षण, नोकरीपासून दूर होता. हे बघवत नव्हते म्हणून आंदोलन केले. आपल्याला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी आरक्षण मिळाले आहे. याला काही जण गुलामीचे जॅकेट म्हणून हिणवत आहेत. जर आमचे आरक्षण गुलामी काळातील असेल तर तुम्हाला १९४१ च्या जनगणनेनुसार दिलेले आरक्षण कसे चालते? असा सवाल जरांगे यांनी दसरा मेळाव्यात ओबीसी नेत्यांना उद्देशून केला. एकूणच यंदाच्या मेळाव्यातील नेत्यांची भाषणे तपासली तर काही अपवाद वगळता भाषणातून समाजमनाला दिशा देण्याऐवजी राजकारण, जातपात, वैयक्तिक हेवेदावेच दिसून आले. त्यामुळे सीमोल्लंघनाची अपेक्षा नेमकी कुणाकडून ठेवायची? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

उमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, एका इच्छुक उमेदवाराच्या ‘ओल्या पार्टी’तून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या...