नाशिक | Nashik
मागील वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मंत्रिमंडळ विस्तार पार पडून मंत्र्यांचे खातेवाटप आणि पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्याचे वाटप करण्यात आले.
यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वाट्याला अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईच्या मलबार हिल परिसरातल ‘वर्षा’ हा बंगला आला आहे. पंरतु, अद्यापही देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) राहण्यासाठी गेले नाहीत. यानंतर आता हाच धागा पकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलतांना खळबळजनक दावा केला आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,”मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? मारूती कांबळेचे काय झाले? मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके महिने झाले, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, तिथे का जात नाहीत? याचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे. भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीला (Kamakhya Devi) रेडे कापले, त्याची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली आहेत, असा स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात”, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. राऊतांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राऊत पुढे म्हणाले की,”आमचा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पळणारी लोक आहोत. आम्ही मुद्दा लावून धरत आहोत, काहीतरी वेगळे घडू शकते. नेमके काय झाले, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्थिर अस्वस्थ आहेत? आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे. अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम करणारा आहे. फुले, शाहू यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले, तरीही महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अंधश्रद्धा कायम आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.