मुंबई | Mumbai
मविआसह मनसेने निवडणूक आयोगाविरोधात मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून आज (०१ नोव्हेंबर) रोजी मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मेट्रो सिनेमामार्गे ‘सत्याचा मोर्चा’ काढला. यानंतर मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नेत्यांच्या सांगता सभांनी मोर्चाचा समारोप झाला. यावेळी शरद पवार,राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांनी सरकावर निशाणा साधला. यावेळी मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देत असून, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनी जागं झालं पाहिजे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रानंतर (Maharashtra) राज्यातील राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदा झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, तर लोकशाहीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो आज ठिणगी बघत आहे. या ठिणगीची आग कधी होईल सांगता येत नाही. तुमच्या बुडाला आग लागेल. शोलेत एक डायलॉग आहे. दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाही तर अॅनाकोंडा येईल” असे त्यांनी म्हटले.
तसेच “मतदान (Vote) चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देत आहोतच पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनेही जागं झालं पाहिजे. त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकवा. बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आज एवढे सगळे धडधडीत पुरावे दाखवले, तरीही निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही. आपले पक्ष चोरले, नाव चोरले, तेवढं पुरेसं नाही म्हणून आता मतदारही चोरले जात आहेत. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, आजही महाराष्ट्र एकवटला आहे. ज्या गोष्टी आता आम्ही विरोधी पक्ष करत आहोत, तसेच सगळ्या मतदारांनीही जागृत व्हावं आणि मतदार याद्या तपासाव्यात. राजने डोंगरच उभा केला. तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही. निवडणूक आयोग यांचा नोकर आहे. मी अॅनाकोंडा काय म्हणालो यांची भूक थांबत नाही. ते पुरत नाही म्हणून मतदान चोरी करत आहेत”, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना जाहीर आव्हान
मुख्यमंत्री (CM) बोलत आहेत त्यानुसार त्यांनी मतचोरी होत असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मी आता मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, तुम्ही आमचा पर्दाफाश करा. एकदाचं दूध का दूध पानी का पानी होऊ द्या. आज संपूर्ण महाराष्ट्र एकवटला असून, देशाला दिशा देत आहे. आपण पक्ष बाजूला ठेवून एकवटलो आहोत. . मत चोर दिसेल त्याला लोकशाहीच्या मार्गाने फटकावा. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंच्या नावाने खोटा व्हेरिफिकेशन अर्ज
यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या नावाने खोटा व्हेरिफिकेशन अर्ज करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा केला.ते म्हणाले, “गळे पुरावे घेऊन न्यायलयात जाणार असून, न्याय मिळेल अपेक्षा आहे.आम्ही एकत्र तुमच्यासाठी आलो असून, हिंदूंसाठी एकत्र लढणार आहोत. मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्या शिवाय राहणार नाही. जनता तुमचा निर्णय करेल असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.




