मुंबई | Mumbai
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) नुकसान झालेल्या पिकांची नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत जाऊन पाहणी केली. यावेळी कोकाटे यांनी ‘कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचे तुम्ही काय करता? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा’ असे त्यांनी म्हटले होते. यावरून आता मंत्री कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात असून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, “मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. मात्र, असे असतानाही सरकार आणि कृषीमंत्री (Minister of Agriculture) सत्तेच्या मस्तीत वावरत आहे. शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही”, असा आरोप त्यांनी केला आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, “सत्तेवर येण्याच्या आधी ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिली आहे. एकवेळ लाडक्या बहीणींना १५०० रुपयाचे आता २१०० रुपये पण दिले जातील. मात्र, ते पुढच्या निवडणूकीच्या (Election) तोंडावर दिले जातील”, असे म्हणत त्यांनी सरकारला (Government) चिमटा काढला आहे.
कोकाटे नेमकं काय म्हणाले होते?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकरी (Farmer) कर्जमाफीबाबत एका शेतकऱ्याने, ‘अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ असे म्हटले. त्यावर बोलतांना कोकाटे म्हणाले की,” पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत, सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते, शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असे विधान त्यांनी केले होते.