मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
मराठवाड्यात (Marathawada) सुरु असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लक्ष ठेवून असून त्यांनी आज (सोमवारी) मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव आणि संचालकांशी बोलून त्यांनाही सूचना केल्या.
पावसाने (Rain) थैमान घातल्याने मराठवाड्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी (Collector) फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
दरमान, धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv District) परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले. एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा आणि वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी, असेही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
अजित पवार यांच्याकडूनही आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा घेतला. धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील साकत येथे मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाणी शिरले आहे. पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्क तुटला असून तिथे १२ नागरिक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले. साकत गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवावे तसेच हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करावी,अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
काढणी पिके सुरक्षित ठेवण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
दरम्यान, २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.




