मुंबई | Mumbai
राज्यात शनिवारपासून पावसाला (Rain) दमदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला असून, पुढील २४ तासांत काही ठिकाणी अति मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तसेच काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि एका जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) काही भागासह पालघर, मुंबई, ठाणे, या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच या भागांनाही येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा काही भाग, सातारा जिल्ह्याचा काही भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर रायगड जिल्ह्याला (Raigad District) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्हे आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यासोबतच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबईसाठी इशारा
भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील तीन तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.




