मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्य सरकारच्या वतीने काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या काश्मीर दौऱ्यात काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही सुरु केली आहे. जम्मू आणि काश्मिर सरकारने बडगाम जिल्हयातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर जमीन महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी प्रदान केली आहे.
जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र आणि जम्मू-कशिमर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आता या भूखंडावर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरुपाचे असावे, त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन आणि आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल आणि लवकरच कश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.