नागपूर | Nagpur
विधीमंडळच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळ विरोधी पक्षेनेत्याच्या निवडीवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसत आहे. यावरुन विरोधकांनी सकारवर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेत्यासाठी चर्चेत आहे, महाविकास आघाडीचे एकूण आमदार 46 आहेत. त्यात सर्वाधिक 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे आहे. म्हणून ते विरोधी पक्षनेते पदाची मागणी करत आहेत.
असे असतानाच, आज विरोधी पक्षनेतेपदासाठी अचानक आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आले. भास्कर जाधव यांच्याजागी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदी नेमण्याची ठाकरे गटात चर्चा असल्याची बातमी आली. उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे.
आम्ही पदासाठी नाही तर लोकशाहीमध्ये पद आहे त्यासाठी भांडत आहोत
याबद्दल आमदार आदित्य ठाकरे विचारले असता ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडे सत्ता आहे. त्यांच्याकडे संख्याबळ पण आहे, असे असताना दोन बोगस पद (उपमुख्यमंत्री) कशाला निर्माण केले? असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेतेपदाबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी भाजपचा अॅनाकोंडा आणि त्यांचे दोन विषारी साप यांची वृत्ती ही सगळे काही ढापायचे, सगळे काही गिळायचे अशी आहे. सहकार्य आणि सहकार हा त्यांचा स्वभावच नाही. आम्ही पदासाठी भांडत नाही तर लोकशाहीमध्ये जे पद आहे त्यासाठी भांडत आहोत. यांनी दोन खोटी पदं निर्माण केली पण जे संविधानिक पद आहे ते दिले जात नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
पेरलेल्या बातम्या आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका
शिवसेनेकडून (ठाकरे) विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असल्याचे शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. तर आमदार निलेश राणे म्हणाले की, जोपर्यंत दोन्ही ठाकरे सभागृहात आहेत तोपर्यंत भास्कर जाधव विरोधी पक्षनेता होणार नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, या पेरलेल्या बातम्या आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नावाची होत असलेली चर्चा त्यांनी स्वतः फेटाळून लावली आहे.
निलेश राणेंचे प्रत्युत्तर
त्यावर कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. “ज्योतिषी आहेत का ते ? त्यांचे 20 च आमदार राहिले आहेत. नको त्या विषयांमध्ये त्यांनी बोलू नये” असे निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना सुनावले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




