मुंबई | Mumbai
शिल्पकलेतील ‘भीष्माचार्य’ राम सुतार (Ram Sutar) यांचं वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे शिल्पकला पोरकी झाली आहे. राम सुतार यांना या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी २० मार्च रोजी विधानसभेत (Vidhansabha) याबाबतची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन सुतार यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायले होते.
राम सुतार यांचा परिचय
राम सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावात झाला. त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये औपचारिक शिक्षण पूर्ण केले. तर श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले. त्यांच्या कार्याची दखल घेत १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सुमारे ६० वर्षांच्या कारकिर्दीत राम सुतार यांनी ५० हून अधिक भव्य मूर्ती निर्माण केल्या. यामध्ये संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या मूर्तीचा विशेष उल्लेख केला जातो. या मूर्तीच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यांसारख्या देशांमध्येही पाठवण्यात आल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९५२ साली त्यांनी प्रमिला यांच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा अनिल सुतार हाही एक प्रसिद्ध मूर्तिकार आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील शिक्षणानंतर १९५३ मध्ये राम सुतार यांनी मेयो गोल्ड मेडल पटकावले. १९५४ ते १९५८ या काळात त्यांनी अजिंठा आणि वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक कोरीव काम केले होते. १९५९ साली राम सुतार यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली. मात्र काही वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्प उभारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारणीचे काम केले. याशिवाय शिल्पकलेतील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी दिल्लीमध्ये स्वतःचा शिल्पकलेचा स्टुडिओ उभारला.




