मुंबई | Mumbai
गेल्या अडीच वर्षांपासूनच प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महायुती सरकारकडून काल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे १२ पैकी सात जणांची यादी पाठविण्यात आली होती. त्या यादीवर आज सकाळी राज्यपालांनी शिक्कामोर्तब केले आहे.
यामध्ये ३-२-२ असा फॅार्म्युला वापरण्यात आला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन, शिंदे सेनेला दोन आणि भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. यात भाजपने चित्रा वाघ, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आणि बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विभागाचा चेहरा म्हणून इद्रिस नाईकवाडी यांना संधी दिली आहे.
तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून मनिषा कायंदे आणि माजी खासदार हेमंत पाटील यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, आज दुपारी १२ वाजता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित आमदारांना विधानभवनात आमदारकीची शपथ देणार आहेत.
शपथविधिविरोधात ठाकरे गट हायकोर्टात
राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. मात्र, याच सात विधानपरिषद आमदारांच्या शपथविधीविरोधात शिवसेना ठाकरे गट पुन्हा हायकोर्टात गेला असून याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की,राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी हायकोर्टाचा अंतिम निर्णय राखीव असताना आमदारांची नियुक्ती करणं असंविधानिक असल्याचा याचिकाकर्त्या ठाकरे गटाचा आरोप आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र निकाल राखून ठेवताना हायकोर्टानं राज्य सरकारला याबाबत कुठलेही निर्देश दिलेले नसल्याने नियुक्त्या कायदेशीर असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.