भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने मुख्य संशयित आरोपी करण पथरोड याच्या द्वारका भागातून मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या कडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.
नाशिक शहरात भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गस्त करीत असतांना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे. त्यावरून गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी द्वारका येथे पथकासह सापळा लावला. संशयीत हा द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसुन आल्याने तो पोलीसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले.
संशयित आरोपी करण किसन पथरोड (वय २०, रा.७२ खोली वाल्मीक नगर भुसावळ) याचेकडुन गुन्ह्यात वापरलेली २ देशी पिस्टल व ५ काडतुसे असे एकुण ८४ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन त्याला पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी.के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली.