श्रीरामपूर (प्रतिनिधी)
शहराला श्रीरामपूर पाणीपुरवठा करणाऱ्या एनबी कालव्यालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर काल सकाळी ११ वाजेपासून पाटबंधारे विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. दहाव्या ओट्यापासून महानुभाव आश्रमापर्यंतच्या भागात ही मोहीम राबविण्यात आली. या परिसरातील एकूण ४६ अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.
दहाव्याच्या ओट्यापासून रेल्वे लाईनपर्यंत एका घरासमोर कालव्यालगत शौचालय उभारण्यात आले होते. त्याचे मैलामिश्रीत पाणी थेट कालव्यात सोडले जात होते. त्यामुळे हे शौचालय पाडण्यात आले. तसेच पालिकेच्या अंतर्गत उभारण्यात आलेली ओपन जीम व खेळणी काढण्यात आली. मात्र, कालव्यालगत असलेली मंदिरे कायम ठेवण्यात आली आहेत. गाळेधारकांना यापूर्वीच अंतिम नोटीस देण्यात आल्याने अनधिकृत गाळे हटवण्यात आले. रहिवासी आणि पक्की घरे असलेल्या नागरिकांकडून तीन महिन्यांत जागा रिकामी करण्याचे लेखी पत्र घेण्यात आले आहे.
कालव्यालगत मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसायिकांची दुकाने होती. ती पूर्णपणे हटवून जागा मोकळी करण्यात आली. कारवाईसाठी तीन जेसीबीचा वापर करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. ही संयुक्त कारवाई प्रशासक अधिकारी किरण सावंत पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, कार्यकारी उपअभियंता संजय कलापुरे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अतिक्रमण विभागप्रमुख संजय शेळके, नगर अभियंता अभिषेक मराठी, अभियंता सुर्यकांत गवळी तसेच संजय आरणे, सुनील केदारे, प्रशांत जगधने, राम शेळके व नगरपरिषदेच्या संपूर्ण यंत्रणेने सहभाग घेतला. अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
येत्या काही दिवसांत नॉर्दन ब्रँचपासून पूनम हॉटेलच्या पाठीमागील भागापासून सरस्वती कॉलनी, अशोकनगर पर्यंतच्या सर्वभागासह कॅनॉलच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे काढली जाणार आहेत. कारवाईत कोणी अडथळा आणू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे.




