पुणे | प्रतिनिधी Pune
शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह परिमंडळ एकने मध्यरात्रीच्या सुमारास कोम्ंिबग ऑपरेशन राबवले. त्यावेळी कुंटणखान्यातून दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, चार बांग्लादेशी अल्पवयीन मुलींचीही सुटका केली आहे. त्याठिकाणी नशेची इंजेक्शन, ७ ग्रॅम चरस जप्त केले आहे.एकाच वेळी तब्बल ४१ इमारतीत ७०० पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख उपस्थित होते.
कायदा सुव्यवस्थेसह गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांविरूद्ध कारवाईच्या अनुषंगाने बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. प्रामुख्याने कुंटणखान्यात बेकायदेशीररित्या काही बांग्लादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याचपार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बांग्लादेशींविरूद्ध कारवाईचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल ६०० पोलीस अमलदारांचा फौजफाटा कारवाईत सहभागी झाला होता. मध्यरात्री बारा वाजेनंतर पहाटे चारपर्यंत बुधवार पेठेतील प्रत्येक इमारत, गल्ली-बोळात पायी पेट्रोलिंग करीत ७०० जणांची कसून विचारपूस करीत झाडाझडती घेतली.
बांग्लादेशी महिला ताब्यात, अल्पवयीन मुलींची सुटका
कारवाईवेळी दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच काही अल्पवयीन मुलींचीही सुटका केली आहे. त्यांना पुण्यात कोणी आणले, वेश्या व्यवसाय करण्यास कोणी प्रवृत्त केले, याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, ७ ग्रॅम चरस, नशेचे इंजेक्शन जप्त केले असून, त्यासंदर्भात ड्रग्ज पेडलरांकडेही तपास केला जाणार आहे. दरम्यान, काही वर्षांत पहिल्यांदाच एकाचवेळी चहूबाजूंनी बॅरिकेटस लाउन बुधवार पेठ परिसरात बंद केला होता. त्यानुसार परिसरात आलेल्या आंबट शौकिनांसह कुंटणखान्यातील सर्वाची चौकशी करण्यात आली.





