मालेगाव | प्रतिनिधी
मालेगाव महापालिकेत आज मोठी दुर्घटना घडली. पालिकेच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. लिफ्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त जण शिरल्यामुळे लिफ्टची वायर तुटून थेट खाली कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी हानी टळली.
नेमके काय घटना घडली?
मालेगाव महानगर पालिकेची आज महापौर पदाची निवडणुक होती, त्यासाठी महानगरपालिकेत नगरपालिकेत मोठी गर्दी झाली होती, याच वेळी पाचव्या मजल्यावर असलेल्या लिफ्टमध्ये ८ जणांची क्षमता असलेल्या लिफ्टमध्ये १५ ते १८ जण शिरल्याने लिफ्ट ओव्हरलोड झाली. यादरम्यान, क्षमतेपेक्षा दुप्पट वजन झाल्यामुळे लिफ्टची वायर अचानक तुटली आणि पाचव्या मजल्यावरून लिफ्ट वेगाने खाली आली. सुदैवाने सेफ्टी ब्रेकमुळे लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नाने लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एकामागोमाग एक बाहेर काढण्यात आले. या अपघाताच्या वेळी लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक पाच पत्रकारही अडकले होते. लिफ्ट कोसळल्यानंतर काही काळ महापालिका इमारतीत एकच गोंधळ उडाला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने महापालिका प्रशासन, राजकीय नेते, पत्रकार आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.





