Saturday, June 13, 2026
Homeराजकीयमुंबई महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार? ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट

मुंबई महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार? ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट

मुंबई । Mumbai

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौरपदाच्या निवडणुकीत आता मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर, ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाकरे गटाने या निवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत दिल्याने भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

भाजपने महापौरपदासाठी रितू तावडे, तर उपमहापौरपदासाठी संजय गाडी यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे. ही निवडणूक ११ तारखेला पार पडणार आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “आम्हाला संख्याबळाचे गणित मान्य आहे. भाजपने अखेर एका मराठी चेहऱ्याला महापौरपदाची संधी दिली आहे, त्यामुळे आम्ही यामध्ये कोणताही अडथळा किंवा ‘अपशकुन’ करणार नाही,” असे सांगत त्यांनी ठाकरे गट उमेदवार उभा करणार नसल्याचे स्पष्ट सूचक संकेत दिले आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधतानाच आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, “भाजपला उशिरा का होईना पण मराठी माणूस हिंदू आहे हे मान्य करावे लागले. आता त्यांनी मराठी महापौर दिला आहे, तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता आम्ही सभागृहात जनतेचे प्रश्न मांडत राहू.” यावेळी त्यांनी शिवसेना (शिंदे गट) यांच्यावरही टीका केली. २०२२ पासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरेंनी जपलेले मराठी अस्मितेचे झाड आजही ताठ मानेने उभे आहे. जनतेने दिलेला कौल कोण कशासाठी वापरत आहे, हे मुंबईकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. आमची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेसाठी असून ती यापुढेही सुरूच राहील.

दुसरीकडे, भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. “जवळपास ४४ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता येत आहे. ११ तारखेला माझा विजय निश्चित आहे,” असे त्या म्हणाल्या. तावडे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करताना म्हटले की, गेल्या २५ वर्षांतील भ्रष्टाचारी कारभार आता संपुष्टात येईल. विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसून त्यांचे ५० नगरसेवकही निवडून आलेले नाहीत. मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी सर्व नगरसेवक एकत्र येऊन काम करतील आणि मुंबईकरांना लवकरच शहरात सकारात्मक बदल पाहायला मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Jalgaon Vidhan Parishad Election : नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटला; बंडखोर रेश्मा...

0
जळगाव | Jalgaon स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत (Jalgaon Vidhan Parishad Election) महायुतीसमोर (Mahayuti) उभे ठाकलेले बंडखोरीचे संकट अखेर टळले आहे. शिवसेना (शिंदे...