Friday, May 3, 2024
Homeक्रीडामालेगावची 'धनश्री' गाजविणार कुस्तीचे मैदान

मालेगावची ‘धनश्री’ गाजविणार कुस्तीचे मैदान

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

क्षेत्र कुठलेही असो, त्यात मुली आता मागे राहिलेल्या नाहीत. बालपणापासूनच मिळालेल्या बाळकडूमुळे आजवर अनेक क्षेत्रात महिलांनी यशाचे नवनवे शिखर गाठले आहेत. मात्र कुटुंबाचा कुस्ती क्षेत्राशी दूर-दूर पर्यंत संबंध नसतांना देखील वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ग्रॅपलिंग (कुस्ती) स्पर्धेत सुवर्णपदक मिळवित राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या धनश्री नहार या इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनीच्या यशाची सर्वत्र र्चचा सुरु आहे.

- Advertisement -

तालुक्यातील पाटणे येथील धनश्री प्रविण नहार (वय १३) ही विद्यार्थीनी टेहरे येथील शिवसंस्कार मिलटरी स्कूलमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. वडील मिलींद नहार हे वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असून आई वैष्णवी गृहणी आहे. कुटुंबात आजवर कोणीही कुस्ती खेळाशी जोडले गेलेले नाही. मात्र धनश्रीला पालपणापासून या क्षेत्राची मोठी आवड आहे. अवघ्या तिसरीत असतांना तिने प्रशिक्षणाला सुरुवात केली. पाटणे येथील प्रशांत बच्छाव यांच्या क्लबमध्ये ती प्रशिक्षण घेत आहे.

आतापर्यन्त तिने जवळपास १५ पारितोषिक मिळविले आहेत. कोरोना काळापूर्वी तिची नॅशनल स्पर्धेसाठी निवड होता-होता राहिली. मात्र तिने हार न मानता आपला सराव सुरुच ठेवला. गेल्यावर्षी डिसेंबर २०२१ मध्ये तिने दिल्ली, हरियाणा येथे जावून आपल्या नावाचा डंका गाजविला. धनश्री ने इतक्या लहान वयात स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळविले असल्याचे तिचे वडील प्रविण नहार अभिमानाने सांगतात. नुकत्याच २६ व २७ सप्टेंबर २०२२ रोजी धुळे येथे झालेल्या ग्रॅपलिंग कमिटी ऑफ इंडिया संलग्न ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र व ग्रॅपलिंग कमिटी ऑफ धुळे आयोजित दुसरी महाराष्ट्र राज्य ग्रॅपलिंग (कुस्ती) अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे.

तिने मिळविलेल्या या यशानंतर तिची नोव्हेंबर २०२२ मध्ये मथुरा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. धनश्री ने ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे मालेगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचले असून येत्या काळात अंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविण्याचा धनश्रीचा माणस असल्याचे तिने सांगितले.

धनश्री लहानपणापासूनच मेहनती आहे. तिने आजवर अनेक स्पर्धेत सहभाग घेत यश मिळविले आहे. शाळा सुटल्यानंतर ती बराचवेळ सराव करते. जोपर्यन्त यश मिळत नाही, तोपर्यन्त न थांबण्याचा तिचा निर्धार पक्का असतो. इतक्या लहान वयात तिच्या अंगी असलेली जिद्द कुटुंबात आम्हा सर्वांनाच एक नवी प्रेरणा देवून जाते. तिची लहान बहिण मृणाली ही देखील संगित क्षेत्राशी जोडली गेली आहे.

– प्रविण नहार, धनश्रीचे वडील, पाटणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या