Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखआंब्याचे पीक

आंब्याचे पीक

आज अक्षयतृतीया! वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी जसे की, ‘आखाजी’ म्हणूनही हा सण साजरा केला जातो. उन्हाळा सुरू झाला हे सांगण्याची ही एक पारंपरिक पद्धत! या ऋतुमानाने येणारे खाद्यपदार्थ, जीवनशैलीला येथून सुरूवात व्हावी, असा संकेत देणारा हा सण! उन्हाळा म्हटला की, त्याचे समीकरण आंब्याशी येते. ‘फळांचा राजा’ असलेला आंबा अक्षय तृतीयेपासून सेवन करण्यास सुरूवात करतात. आंब्याचा मोहोर साधारणत: डिसेंबर, जानेवारी म्हणजे थंडीत येतो आणि ते झाड उन्हाळ्यात फळ देऊ लागते. यंदाही सगळीकडे आंब्याच्या झाडांनी सुंदर मोहोर धरला. आंबा ज्या प्रांतात जास्त पिकतो त्या कोकणामधला शेतकरी हा मोहोर पाहून हर्षित झाला. तशीच काहीशी अवस्था आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात आंबा पिकवणार्‍या पेठ, हरसूल, सुरगाणा, दिंडोरी या भागांतील आदिवासी शेतकर्‍यांची झाली. मात्र गेल्या महिन्यापासून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने मात्र आलेला मोहोर झाडून टाकला आणि शेतकरी चिंतेत बसला. थोडेफार जे काय वाचले त्यावर हा उन्हाळा काढायचा या उमेदीने आज नाशिकचा केशर आंबा बाजारात येतोय. तसे बघितले तर पेठ, हरसूल हा भाग आदिवासीबहुल प्रदेश! वातावरण बघता तिथे प्रामुख्याने असलेले भात आणि नागलीचेच पीक! मात्र हे पीक वर्षभरातून फक्त चारच महिने शेतकर्‍यांना साथ देते. ही कोरडवाहू शेती आहे. पावसानंतरच्या काळात लागवड झालेल्या पिकाची काढणी झाली की, त्यांना पाण्याअभावी पुढचे पीक घेता येत नाही. खरीप झाला की, रब्बी हंगाम मात्र रिकामा जातो. त्यामुळे बहुतांश शेतकरी बांधव स्थलांतरीत होतात. या चक्रातून शेतकर्‍यांनी बाहेर पडावे म्हणून अनेक प्रयोग या भागात काही तरुण शेतकरी तसेच कृषी विभाग करीत आहे. शिक्षकीपेशा सोडून हरसूलला आपल्या गावी परत जात अंबादास भोये या तरुण शेतकर्‍याने केशर आंब्याची लागवड करण्यास सुरूवात केली. अभ्यासपूर्ण केलेला हा प्रयोग यशस्वी करीत त्याने जवळ-जवळ सहा हजार झाडांची लागवड केली. नाशिक तसेच गुजरात येथे या आंब्याला थोडीबहुत बाजारपेठही मिळत आहे. पेठ तालुक्यातील कृतिशील शेतकरी यशवंत गावंडे यांनीदेखील आंब्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी केला. त्यांनी त्यांच्या शेतात साधारण चारएक हजार झाडे लावून कलमी आंब्याचे तसेच इतर फळझाडांचे प्रयोग सुरू केले. ते स्वत:पुरते मर्यादित न ठेवता परिसरातील आदिवासी बांधवांना याबाबतचे तंत्र व ज्ञान त्यांनी दिले. पेठ भागातील जवळजवळ 50-60 शेतकरी आता आंब्याची शेती करू लागले आहेत. एकदा रोप लावले व सुरूवातीला त्याची काळजी घेतली तर झाड चांगले मोठे होते. 2-3 वर्षांत झाड फळ द्यायला लागते. नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातील जमीन, हवा आणि उपलब्ध असलेले पाणी यावर केशर जातीचा आंबा चांगला उगवतो हे मुक्त विद्यापीठाच्या कृषी विभागाने आधीच सिद्ध केले आहे. हा आंबा बहुतांश नैसर्गिकरित्याच पिकवलेला आहे. अल्पभूधारक आदिवासी शेतकरी असला तरी त्याला त्याच्या बांधावर काही झाडे लावता येतात. या फळझाडांचे उत्पन्नही ऋतूप्रमाणे त्यांना मिळत राहते. मात्र या साध्या-भोळ्या शेतकर्‍याला अडचण येते ती त्याचा माल विकण्याची! त्यासाठी म्हणून शेतकर्‍यांना एकत्र करीत फॉर्मल प्रोड्युसर कंपन्या त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाजारपेठ आणि चांगला भाव शेतकर्‍यांना मिळाला, पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्नही मार्गी लागला तर पारंपरिक भात व नागली पिकापाठोपाठ आंबा आणि इतर फळांचे उत्पन्न या शेतकर्‍याला निश्चितच मिळू शकेल. मे-जूनदरम्यान मिळालेले हे उत्पन्न त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला आणि त्यांच्या इतर गरजा भागवण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसे झाले तर स्थानिकरित्या जीवनमान सुधारून स्थलांतराचा प्रश्नही काही अंशी हलका होऊ शकतो. हे होण्यासाठी मात्र मिळणार ज्ञान-तंत्र आणि आदिवासी शेतकर्‍यांमधील जागरूकता ही वाढवावी लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या