Friday, May 3, 2024
Homeनाशिकमनमाड : जनता संचारबंदीस संमिश्र प्रतिसाद

मनमाड : जनता संचारबंदीस संमिश्र प्रतिसाद

मनमाड । प्रतिनिधी Manmad

मनमाड शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाने काल पासून पुकारलेल्या पाच दिवसांच्या जनता संचारबंदीस शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही भागातील दुकाने उघडी असल्याचे कळताच व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी शहरात फेरी काढून व्यापारी व दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले असता त्यास प्रतिसाद देण्यात आला.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. करोनाचा जास्त फैलाव हा गर्दीमुळे होतो आणि शहरात रोज बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे करोनाचा धोका जास्त वाढत असल्याचे पाहून करोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी महासंघाने दि. ८ ते ११ जुलै असे पाच दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला.

शहरातील बँका, शासकीय कार्यालये, दूध डेअरी, गिरण्या, मेडिकल, दवाखाने, पेट्रोलपंप, विमा कंपन्या, बाजार समिती यासह इतर काही दुकाने सुरू होती. शिवाय शहरात होणारी नेहमीची गर्दी आजदेखील कायम होती. जनता कर्फ्यू हा व्यापारी महासंघाने जाहीर केला आहे शासनाने नाही. त्यामुळे या निर्णयाशी आमचा संबंध नसल्याचा खुलासा पालिका व पोलीस प्रशानाने केला. रोज होणारी गर्दी कायम होती.

जनता कर्फ्यू हा स्वइच्छेवर असल्याने अनेकांनी दुकाने सुरू ठेवली होती, मात्र काही भागात दुकाने सुरू असल्याचे कळताच व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांनी शहरात फेरी काढून दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असतानाचे चित्र दिसून आले. त्यामुळे अनेक दुकानदारांनी आपली नाराजी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पाच दिवस कडकडीत बंद ठेवल्यानंतर सहाव्या दिवशी जेव्हा दुकाने सुरू होतील तेव्हा बाजारपेठेत तुफान गर्दी होईल. मग या गर्दीला कसे आवरणार? असा प्रश्न काही दुकानदारांनी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या