बीड । Beed
बीडमधील सरपंच प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलंच पेटलंय. विरोधक आक्रमक झाले असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे.
मात्र, अद्यापही या घटनेतील काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि फरार आरोपींना अटक करण्यात यावं, यासाठी बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत. दरम्यान, या मोर्चाच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, यांना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्ही आरोपींना अटक करा, असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
बीड जिल्ह्यातील जनतेच्यावतीने आज मोर्चा काढत आहोत. बीड जिल्ह्यातील जनतेला माझं आवाहन आहे की सर्वांनी मोर्चांमध्ये सहभागी व्हावं, राज्य सरकारला जाग येईल. मात्र, जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही सरकारला जाग आणण्याचं काम करू. या घटनेत न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत. या घटनेत कोणीही मग विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्षांनी राजकारण आणू नये. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. या मोर्चात सत्ताधाऱ्यांनाही सहभागी व्हायचं असेल तर आम्ही नाही म्हटलेलं नाही. विरोधी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणं बंद करावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
तसेच, सत्ताधाऱ्यांनीच आरोपींना लपवून ठेवला आहे का? अशी शंका येत आहे. आता हे लोन राज्यभर पसरणार आहे. राज्यभर आम्ही मोर्चे काढणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा. राज्यभर मोर्चे सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले. सरकार आल्यापासून मुलींचे खून होऊ लागलेत. तुम्ही आल्यापासून खंडण्या मागू लागलेत. निवडणुकीत खूप खर्च सुरू आहे का? गुंडाच्या हाताने राज्य चालवायचे आहे का? गृहमंत्री या कडे का लक्ष देत नाहीत? असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.