बीड । Beed
आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
सभेदरम्यान जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून आव्हान दिले. “बीडमध्ये आमच्या सभेला अडथळे निर्माण केले गेले. जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचं ते करून दाखवा. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिले, आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला मुंबईला जाण्याची गरज नाही. बीडमधूनच मंत्रालयावर गुलाल उधळू,” असे ते म्हणाले.
सभेत पोलिसांनी डीजे वाजवण्यास मज्जाव केला. यावर जरांगे यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट इशारा दिला. “बीडच्या सभेत आम्हाला डीजे वाजवू दिला नाही, ते ठीक आहे. पण आता पुढे बीडमध्ये कुणाचाही डीजे वाजवू देणार नाही. जर पोलिसांना चुकीचे आदेश मिळाले असतील, तर ते अंमलात आणू नका. एखाद्या अधिकाऱ्याला काम करायचेच असेल, तर महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घ्या,” अशी टीका त्यांनी केली.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या एकतेवर भर दिला. “आज बीडमध्ये जमलेली गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झाले आहेत. मराठा समाज एकत्र येत आहे, ही ताकद सरकारने ओळखावी. आजवर सत्ताधाऱ्यांनी आपल्या भावनांचा वापर करून घेतला. त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या भवितव्यावर झाला. उभ्या पिढ्यांचं नुकसान झालं. पण आता आपण विचाराने चालायचं, संघर्षाने नव्हे,” असे ते म्हणाले.
जरांगे यांनी स्पष्ट केले की, आंदोलन हिंसाचारविरहित असेल. “आम्ही शांततेत मुंबईला जाणार, पण आमचा लढा ठाम राहील. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राज्य सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आणि कुणबी एकच आहे हे सरकारने आधी मान्य केलं होतं. पण आता आरक्षण दिलं जात नाही. हैदराबाद आणि साताऱ्याच्या गॅझेट लागू करावं, 58 लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही, त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.




