मुंबई | Mumbai
राज्य सरकारने एखाद्या समाजावर अन्याय होईल, असे वागू नये. मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आंदोलकांना हुसकावून लावलं तर ती सल खोलवर काळजात रुतणारी असेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानावरुन हुसकावून लावू नका. आमच्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केला तर ते अतिघातक ठरेल. तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच मुंबई फक्त आझाद मैदानावर उपोषण करता येईल, बाकी कुठेही नाही, असे स्पष्ट कोर्टाने म्हटले. मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मेलो तरी, मागे हटणार नाही, असा पवित्रा हाती घेतला आहे.
मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
पुढे जरांगे पाटील यांनी म्हटले, मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत. न्यायदैवतेने आम्हाला आतापर्यंत न्याय दिलाय आणि आताही आमच्याबाजूने न्याय करेल. हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असे स्पष्टपणे म्हणताना जरांगे पाटील यांनी म्हटले. आम्ही शांततेत अमरण उपोषणाला बसलो आहोत. आम्ही रात्री सांगितले की, रस्त्यावरील गाड्या काढा आणि मैदानात लावा, त्यानंतर चार ते पाच तासात आमच्या पोरांनी सर्व गाड्या काढल्या, यापेक्षा अधिक पालन काय करायला पाहिजे. आम्ही कायद्याचे आणि न्याय देवतेचे पालक करतो.
माझी तब्येत कितीही खराब झाली तरी शांत रहायचं
मराठा आंदोलनाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास झाला असल्याचे याचिकेतून नमुद आहे. यावरून मनोज जरांगेंनी मराठ्यांना आवाहन केले आहे. ‘मराठ्यांना शेवटचे सांगतो. गाड्या पार्गिंकला लावा. मैदानात लावा.. रेल्वे, एसटीने प्रवास करा.. कुठे गाड्या लावू देत नसतील तर, वाशीला लावा अन् रेल्वेने या.. माझी तब्येत कितीही खराब झाली तरी शांतच राहायचे, वेड्यासारखे करायचे नाही. तुम्हाला माझी मया आहे, मला तुमची मया आहे. कितीही त्रास झाला तरी शांत राहायचे’, असं जरांगे पाटील म्हणाले.
सरकारने आम्हाला कितीही भीती घातली तरी आम्ही भिणार नाही. आम्ही मराठ्यांची औलाद आहोत. आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या, देवेंद्र फडणवीस. मी जे जे बोलतो, ते ते होत असतं. आणखी मराठे मुंबईत यायला सुरुवात झाली नाही. शनिवारी आणि रविवारी मराठे मुंबईत आले तर सोमवारचे आंदोलन खूप छान असेल. ती वेळ येऊन देऊ नका. तुम्ही जास्तीत जास्त काय कराल? १०० पोलीस आले तरी अटक करणार आहेत, १ लाख पोलीस आले तरी अटक करुन जेललाच नेतील. आम्ही जेलमध्येही उपोषण करु. पण आता सरकाला सुट्टी नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
मेलो तरी मैदानातून हटणार नाही
राज्य सरकारने नको त्या विषयात घुसू नये. आम्हाला आझाद मैदानातून हाकलवून देण्याच्या वल्गना बंद करा. मी मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. सरकार कुठल्याही थराला गेले तरी मी त्या थराला जाईन. मराठा काय असतात, हे 350 वर्षांनी पुन्हा बघायचं असेल तर माझा नाईलाज आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




