पुणे(प्रतिनिधी)
एक राजा तर बिनडोक आहे असे मी म्हणेन, दुसरे संभाजी राजे यांनी भूमिका घेतली हे बरोबर असले तरी त्यांचे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त भर आहे असे दिसते आहे, अशी टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्यावर केली. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा असून 10 ऑक्टोबरला मराठा आरक्षण समाजाने दिलेल्या बंदला ‘वंचित’चा पाठींबा असणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बिनडोक असा उल्लेख करून राजांना तुम्ही अंगावर घेता, असे विचारताच मी कधीच कोणाला भीत नाही आणि भ्यायलो नाही असे ते म्हणाले. ज्या माणसाला घटना माहिती नाही, आम्हाला आरक्षण मिळाले तर सर्वांचे आरक्षण रद्द करा अशी जे भूमिका घेतात अशांना भाजपने राज्य सभेत पाठवलेच कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत कोणत्या राजाला मानायचं कोणाला मानायचं नाही, हा मराठा समाजाचा प्रश्न असे असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाला पाठींबा
मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा असणार आहे. मात्र यावेळी OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. 10 ऑक्टोबरला मराठा आरक्षण समाजाने दिलेल्या बंदला ‘वंचित’चा पाठींबा असणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामंजस्य बिघडू नये म्हणून आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. सुरेश पाटील यांनी मला १० तारखेच्या मोर्चाला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. या प्रश्नावरून मराठा संघटनांमध्ये वेगवेगळ गट निर्माण होण्याची शक्यता आहे. यापैकी काहीजण भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ शकतात. परिणामी राज्यातील सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची दक्षता घेतली जावी. दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होऊ द्या
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा होऊ द्या, यातून मार्ग काढतायेईल, असे मार्ग यापूर्वी निघाले आहेत असे ते म्हणाले. मंदिरे खुली करण्याची आमची मागणी केंद्राने मान्य केली मात्र राज्य सरकारने ती अद्याप मान्य केलेली नाही असे त्यांनी सांगितले.