Friday, May 17, 2024
Homeअग्रलेखमराठी पाऊल पडते पुढे...!

मराठी पाऊल पडते पुढे…!

स्वतंत्र भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा झाला. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सवात तो साजरा झाला याला अधिक महत्व आहे. देशातील मुख्य समारंभ नवी दिल्लीच्या राजपथावर नेहमीच्या परंपरेने मोठ्या दिमाखात पार पडला. नेत्रदीपक संचलन, देशाच्या सैन्यबळाचे प्रदर्शन करण्यात आले. दरवर्षी लाखांवर नागरिकांची उपस्थिती असणाऱ्या या सोहळ्यावर यंदाही करोना महामारीचे गडद सावट होते. त्यामुळे अवघ्या पाच हजार नागरिकांनाच यावेळी प्रवेश दिला गेला. महाराष्ट्राचा वैशिष्टपूर्ण चित्ररथ संचालनाचे खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरात महाराष्ट्राचे एनसीसी पथक देशात सर्वोत्तम ठरले. प्रतिष्ठेचा ‘पंतप्रधान ध्वज’ महाराष्ट्र पथकाने पटकावला. वर्षभरात कामगिरी बजावणाऱ्या राज्याला प्रतिष्ठेचा हा सन्मान दिला जातो. देशात बहुतेक सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर असतो. लसीकरण, जीएसटी संकलन आदी बाबतीत महाराष्ट्राने आघाडी टिकवून ठेवली आहे. करोनाकाळात निर्माण झालेली प्राणवायू टंचाई दूर करण्यात महाराष्ट्राने अल्पावधीत आघाडी मिळवली. ही उदाहरणे ताजीच आहेत. केंद्र सरकारच्या पुरेशा मार्गदर्शन मिळत नसतानासुद्धा राज्याचे हे चौफेर अग्रेसरत्व उठून दिसले. देशात एनसीसीची सतरा संचालनालये आहेत. त्यातून दरवर्षी एकाची निवड केली जाते. एनसीसी संचलनात सर्वोत्तम ठरून एनसीसी पथकाने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सर्वोत्तम आणि उदात्त-उन्नततेचा सदैव ध्यास धरणाऱ्या महाराष्ट्राला कोणताही भेदाभेद झाला नाही तर गुणवत्तेत सहसा कोणी मागे टाकू शकत नाही. एनसीसी पथकाचे यशही असेच बावनकशी आहे. १८ व्यांदा हा सन्मान मिळवण्याचा करिष्मा महाराष्ट्राच्या पथकाने दाखवला आहे. प्रत्येक वेळी महाराष्ट्रालाच सन्मान मिळावा, अशी अपेक्षा मराठी माणूस ठेवणार नाही, पण यशास पात्र ठरूनही डावलले गेले तर ते स्वाभिमानी महाराष्ट्राला रुचणार नाही. संघराज्य प्रणाली अंगिकारलेल्या देशात केंद्र सरकारची भूमिका महत्वाची असते. राज्या-राज्यांबाबत आप-परभाव न बाळगता केंद्र सरकारने संतुलित भूमिका घेतली पाहिजे. दुर्दैवाने देशात प्रत्येक क्षेत्रात हटकून राजकारण आणण्याची खोड नेतेमंडळींना पडली आहे. सामाजिक-सांस्कृतिक बाबतीतसुद्धा राजकारणाला अकारण महत्व दिले जात आहे. राजपथावरील यावेळच्या संचलनासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. हो-ना करता अखेरच्या टप्प्यात परवानगी दिली गेली हे या दुजाभावाचेच निदर्शक! पर्यावरण संवर्धनाबाबत आज सर्वत्र चर्चा सुरू आहे. पर्यावरणविषयक जनजागृतीवर जगात सर्वत्र भर दिला जात आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावरचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. संचलनात कोणत्या राज्याचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरणार, याबाबतचा निकाल अजून यायचा आहे. मात्र महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने प्रजासत्ताक दिन गाजवल्याने तमाम मराठी जनांची मान अभिमानाने उंचावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या