Friday, May 3, 2024
Homeनगरबाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादीचे काम सुरू

बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादीचे काम सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरू केली आहे. त्यानुसार राहाता व श्रीरामपूर वगळता जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाने मात्र राहाता व श्रीरामपूर बाजार समित्यांच्या निवडणुका त्यापूर्वी होणार आहेत. श्रीरामपूरची प्रारूप यादी बुधवारी प्रसिद्ध झाली तर राहात्याची अंतिम यादी 21 ऑक्टोबरला अंतिम होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांवरील संचालक मंडळाची मुदत पूर्वीच वेगवेगळ्या कालावधीत संपुष्टात आलेली आहे. मात्र, करोना संसर्ग परिस्थिती, पाऊसकाळ आदी कारणाने राज्य सरकारने या निवडणुका वेळोवेळी पुढे ढकलल्या. दरम्यानच्या काळात राजकीय परिस्थितीनुसार काही बाजार समित्यांवर प्रशासकही नियुक्त करण्यात आले तर काहींना मुदतवाढ मिळाली होती. जिल्ह्यात एकूण 14 बाजार समिती आहेत. मध्यंतरी बाजार समितींच्या मतदारसंघाची फेररचना करण्यात आली. ती पुन्हा रद्द करण्यात आली. आता पूर्वीच्याच मतदारसंघानुसार 18 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये सोसायटीमधील 11, ग्रामपंचायत 4, व्यापारी 2 व हमाल माथाडी 1 अशा त्या एकूण 18 जागा आहेत.

राहाता व श्रीरामपूर बाजार समित्यांची प्रकरणे उच्च न्यायालयात गेल्याने, न्यायालयाच्या आदेशानुसार इतर बाजार समित्यांच्या आधी या दोन ठिकाणी निवडणुका होतील. त्यानुसार श्रीरामपूरची प्रारूप यादी काल प्रसिद्ध करण्यात आली तर राहत्याच्या यादीवर हरकती मागवल्या गेल्या होत्या. एक हरकत प्राप्त झाली आहे. त्याच्या सुनावणीची मुदत 19 ऑक्टोबरपर्यंत आहे, त्यानंतर 21 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

इतर सर्व बाजार समित्यांच्या प्रारूप याद्या 14 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहेत. सध्या सहायक उपनिबंधक, गटविकास अधिकारी व समित्यांचे सचिव प्रारूप मतदारयादी तयार करत आहेत. सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार 23 डिसेंबरला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. 29 जानेवारीला निवडणुका होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या