संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील चंदनापुरी येथे पैशांसाठी व मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती, सासरे, सासू, नणंद व नंदाई यांनी वारंवार मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व मानसिक छळ केल्यामुळे प्रगती अविनाश पवार या तरुण विवाहितेने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.14) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चौघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रगतीचे वडील, आई अनिता व मुलगी भारती हे तिघे चंदनापुरी येथे राहतात. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या या कुटुंबाने 22 जून 2018 चंदनापुरी येथे थाटामाटात प्रगतीचे लग्न अविनाश उत्तम पवार याच्याशी लावून दिले.
लग्नानंतर सुरुवातीच्या चार-पाच महिन्यांपर्यंत प्रगतीला पती अविनाश, सासरे उत्तम पवार व सासू वत्सला उत्तम पवार यांच्याकडून चांगली वागणूक मिळाली. यानंतर किरकोळ कारणांवरून प्रगतीसोबत वाद सुरू झाले. नवीन फ्लॉट घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणावेत, असा दबाव तिच्यावर टाकण्यात आला. प्रगतीने ही बाब सणासुदीला माहेरी आल्यावर आई-वडिलांना सांगितली. परंतु प्रगतीच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ते पैसे देऊ शकले नाहीत. पैसे न दिल्याने प्रगतीला सासरचे लोक वारंवार शिवीगाळ, मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ करू लागले. तरीही माहेरच्यांनी सासरच्यांना समजावून सांगत प्रगतीला सासरी नांदण्यासाठी पाठवत होते.
सन 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रगतीची नणंद कविता रवींद्र देवकर व तिचा पती रवींद्र देवकर (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) हे चंदनापुरी येथे सासरी राहण्यास आले. ते आल्यानंतर प्रगतीवरील छळ अधिक वाढला. पैशांच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करून प्रगतीला त्रास दिला जाऊ लागला. तिला वारंवार मारहाण करून माहेरी पाठवले जात होते. माहेरच्यांनी मध्यस्थी करून तिला पुन्हा सासरी पाठवले. सन 2024 मध्ये प्रगतीला लग्न होऊन सहा वर्षे पूर्ण झाली तरी तिला अपत्य झालं नाही, या कारणावरूनही तिचा छळ सुरू झाला. पती अविनाश, सासरे उत्तम, सासू वत्सला, नणंद कविता आणि नंदाई रवींद्र यांनी प्रगतीला शिवीगाळ करून, मारहाण करून घरातून हाकलून दिले.
यावेळी प्रगती तब्बल 15 दिवस सासरी गेली नाही. त्यानंतर माहेरच्यांनी व गावातील लोकांनी मध्यस्थी करून तिला पुन्हा सासरी पाठवले. दरम्यान, प्रगती दळण दळण्यासाठी माहेरी येत असताना प्रगतीने आई अनिता व आजी पार्वताबाई यांना वारंवार सांगितले, की माझे सासरचे लोक पैशांसाठी मला सतत त्रास देतात, मारहाण करतात या छळाला मी कंटाळले आहे, असे म्हणत ती रडत असे. तरीही माहेरच्यांनी तिला समजावत राहिले. मात्र, 14 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी पुन्हा पती, सासरे, सासू यांनी पैशांच्या कारणावरून आणि अपत्य नसल्याच्या कारणावरून प्रगतीला शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या सततच्या छळाला कंटाळून त्याच दिवशी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास तिने चंदनापुरी येथील सासरच्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी कडीला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर माहेरच्यांनी संताप व्यक्त करत पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सुरेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पती अविनाश उत्तम पवार, सासरे उत्तम काशिनाथ पवार, सासू वत्सला उत्तम पवार (तिघे रा. चंदनापुरी), नणंद कविता रवींद्र देवकर आणि नंदाई रवींद्र लक्ष्मण देवकर (रा. शिंदोडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे हे करत आहे.




