लातूर । Latur
औसा शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी घडलेल्या घटनेने नागरिकांना एकच धक्का बसला. पुण्यावरून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसने शहरात प्रवेश करताच अचानक भीषण आग धुमसली. पहाटेच्या गारव्यामध्ये शांतपणे प्रवास सुरू असताना, टायर फुटल्याचा मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच बसच्या चाकाजवळून धुराचे लोट निघू लागले. चालकाने तत्परता दाखवत गाडी थांबवली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, पण बस मात्र आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.
प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले असले तरी त्यांचे बॅगा, मौल्यवान वस्तू, कपडे आणि वैयक्तिक साहित्य पूर्णपणे नष्ट झाले. या आगीचा भडका इतका तीव्र होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाला व शेजारील घरालाही आग लागली. या ठिकाणी ठेवलेला लाखो रुपयांचा माल क्षणात खाक झाला. नागरिकांनी पाण्याच्या बादल्या, पाईप आणि इतर साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आगीचा जोर पाहता अग्निशमन दलाला बोलावावे लागले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून अखेर आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत ट्रॅव्हल्स, दुकान आणि घराचा मोठा भाग नष्ट झाला होता. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने, कुणीही जखमी झाले नसले तरी झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीने संबंधितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांची विचारपूस केली. त्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी आग लागण्याचे नेमके कारण तपासण्यास सुरुवात केली असून, या घटनेने औसा परिसरात खळबळ उडाली आहे.




