Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रवैद्यकीय परीक्षा रद्द होणार नाही - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वैद्यकीय परीक्षा रद्द होणार नाही – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई । प्रतिनिधी

सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, असा खुलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी केला.

- Advertisement -

त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी येत्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी आज प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे २ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जून पासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी केल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.

त्यामुळे परीक्षा रद्द कराव्यात, त्या पुढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी काही विद्यार्थी करीत आहेत. वास्तविक वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दकरणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही. केंद्रीय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरत असल्याचे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या