अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहर व परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, येथील एमआयडीसीतील एका पेंट दुकानाचे शटर उचकटून दीड लाख रूपयांच्या रोकडसह 1 लाख 60 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (8 डिसेंबर) ही घटना घडली असून मंगळवारी (9 डिसेंबर) याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद राजु मालु (वय 39, रा. कराचीवालानगर, सर्जेपुरा, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद राजू मालू यांचे लामखेडे चौक, साहिबा बेकरीजवळ, मालू पेंट दुकान आहे. अज्ञात चोरट्याने सोमवारी त्यांच्या दुकानाला लक्ष्य केले. अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील रोकड व मोबाईल फोन चोरून नेले. चोरट्याने सुमारे 1 लाख 50 हजार रूपये किमतीची रोख रकमेची बॅग आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 60 हजार रूपयांचा ऐवज चोरला आहे. गोविंद मालू यांनी दुसर्या दिवशी मंगळवारी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सीसीटीव्ही व स्थानिक खबर्यामार्फत संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार खेडकर करीत आहेत.




