पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
शहरात परप्रांतीय व्यापार्यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करत लूटमार करणार्या चार सराईत गुन्हेगारांना पाथर्डी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश नवनाथ मडके (वय 36), शुभम अंबादास कराड (वय 23), केतन दिगंबर जाधव (वय 29, सर्व रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी), सुहास काशिनाथ ढाकणे (वय 34, रा. एडके कॉलनी, पाथर्डी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी केतन जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, अपहरण, दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उत्तर प्रदेशातील अजयसिंग रजसिंग नायक, सुनिलकुमार छत्तरसिंग नायक आणि यादसिंह बालकिशन नायक हे तिघे कारने पाथर्डी शहरातील अहिल्यानगर रोडवरील शंकर नगर येथे वस्तू विक्रीसाठी आले होते. यावेळी नऊ आरोपींनी त्यांचे गाडीसह अपहरण केले. आरोपींनी व्यापार्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, गॅस शेगडी, होम थिएटर, कुलर आदी वस्तूंसह एकूण 49 हजार रुपयांचा माल लुटला. तसेच साक्षीदारांना धमकावून त्यांच्याकडून 7,500 रुपये गुगल पे द्वारे घेतले.
यानंतर, आरोपींनी व्यापार्यांना गाडीत बसवून अहिल्यानगर रोडवर नेत त्यांची गाडी भरधाव चालवत समोरून येणार्या कारला जोरदार धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले तसेच प्रवाशांना दुखापती झाल्या. गुन्हा दाखल होताच पाथर्डी पोलिसांनी चार स्वतंत्र पथके स्थापन करून तपास सुरू केला.




