अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात दूध भेसळविरोधी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी छापे टाकून दूध भेसळीची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्या काही दूध डेअरींचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका दूध डेअरीच्या परवाना निलंबनानंतर तो पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या नगर कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी दूध व्यावसायिकांमधून होत असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील एका दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने 20 ऑगस्टदरम्यान छापा टाकून तपासणी केली होती.
या तपासणीदरम्यान डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे. दूध संकलनाच्या मागील नोंदी उपलब्ध नसल्याचेही तपासणीत निदर्शनास आल्याचे सांगितले जाते. तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या आधारे संबंधित डेअरीचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्यामुळे नियमांचे पालन करून त्रुटी दूर केल्यानंतरच व्यवसाय सुरू करण्याची अपेक्षा होती.
मात्र, परवाना निलंबित झाल्यानंतरही संबंधित डेअरी चालकाने प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करता डेअरी सुरू ठेवल्याचे आता समोर आल्याचा आरोप केला जात आहे. असे असतानाही अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर येथील सहाय्यक आयुक्तांनी संबंधित डेअरीचा परवाना पुन्हा पूर्ववत करून दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे निलंबनाचा आदेश नेमका कोणत्या कारणांवरून मागे घेण्यात आला, तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता झाली होती का आणि निलंबनाच्या कालावधीत डेअरी सुरू ठेवल्याबाबत काही कारवाई करण्यात आली का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कारवाईतील दुहेरी निकषांची चर्चा
या प्रकरणामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या जिल्ह्यातील कारवाईच्या पद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अन्य काही दूध डेअरींचे परवाने किरकोळ कारणांवरून निलंबित करण्यात आल्याचा दावा दूध व्यावसायिकांकडून केला जात आहे. संबंधित व्यावसायिकांना बदनामीला सामोरे जावे लागल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे, राहुरी तालुक्यातील त्या डेअरीमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळल्याचे सांगितले जात असताना आणि परवाना निलंबित असतानाही व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप असताना, या डेअरीचा परवाना पूर्ववत कसा करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.




